
महाराष्ट्राची कबड्डीकन्या सोनाली शिंगटेच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या हिंदुस्थानच्या महिला संघाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना उपांत्य सामन्यात नेपाळची 58-18 अशी धुळधाण उडवत सलग पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. आता पुन्हा एकदा हिंदुस्थानी महिला इराणी महिलांचा फडशा पाडून आशियाई कबड्डी अजिंक्यपदावर आपला दबदबा दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. शनिवारी हा अंतिम सामना रंगणार आहे.
आशियाई कबड्डी अजिंक्यपदाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा हिंदुस्थानी महिला मैदानात उतरल्या आहेत तेव्हा तेव्हा त्यांनीच बाजी मारलीय. गेल्या पाच स्पर्धांपैकी चार स्पर्धांत हिंदुस्थान महिलाच आशियाई विजेत्या ठरल्या आहेत. फक्त 2016 साली बुसान येथे झालेल्या स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ सहभागी झाला नव्हता. त्या स्पर्धेत यजमान दक्षिण कोरियाने थायलंडचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले होते.
हिंदुस्थानी महिलांसमोर साऱ्याच दुबळय़ा
महिलांच्या कबड्डीत हिंदुस्थानला केवळ इराणचा संघच आव्हान देण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र आजवर एकदाही इराणी महिलांनी हिंदुस्थानी महिलांवर मात करण्यात यश मिळवलेले नाही. उद्याही हिंदुस्थानचा बलाढय़ संघ इराणी महिलांचा सहज पराभव करत पाचव्यांदा अजिंक्य होणार याचे स्पष्ट संकेत गेल्या चार सामन्यांत हिंदुस्थानी संघाने दाखवून दिलेय. काल हिंदुस्थानी महिलांनी बांगलादेशचा 64-23 तर थायलंडचा 76-21 असा धुव्वा उडवला होता. तर आज झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात मलेशियावर 73-19 अशी मात करत विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली.
कमकुवत इराकी महिलांवर मात करत नेपाळचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, पण त्यांना हिंदुस्थानी महिलांसमोर काहीही करता आले नाही. हा सामना एकतर्फी होणार याची झलक महिलांच्या जोरदार चढायांनी दिली. सलग चौथ्याही सामन्यात गुणांचे अर्धशतक गाठत हिंदुस्थानने 56-18 अशा दिमाखात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे इराणने बांगलादेशचा 41-18 असा पराभव करत हिंदुस्थानला पुन्हा एकदा आव्हान देण्यासाठी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. इराणनेही साखळीत इराक (58-13) आणि नेपाळचा (47-14) पराभव केला होता. आशियाई कबड्डीत हिंदुस्थानने नेहमीच आपले वर्चस्व दाखवले आहे. हिंदुस्थानी महिला पाचव्यांदा अंतिम फेरीत खेळणार आहेत, तर इराणला तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचता आले आहे.




























































