उमानंदा घाटावर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सापडल्या 42 पुरातन मूर्ती व पुजेचे साहित्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममधील गुवाहाटी येथे उमानंदा घाटावर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये 42 पुरातन मूर्ती आणि पुजेसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुमल्य वस्तू सापडल्या आहेत. या मूर्ती विविध धातूंपासून तयार करण्यात आल्या आहेत. भगवान गणेश, भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, देवी सरस्वती, देवी लक्ष्मी, गौतम बुद्ध यासह अन्य देवी-देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे. या मूर्ती नक्की कोणी येथे आणून ठेवल्या या कोड्याचे उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स‘ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनू अली नावाचा एक चहा विक्रेता शनिवारी सायंकाळी उमानंदा घाटावर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये उतरला होता. नदीपात्रामध्ये थोडा आत गेल्यानंतर त्याच्या पायाला काहीतरी कठिण वस्तू लागली. सोनूने खाली वाकून ती वस्तू बाहेर काढून पाहिली असता ती भगवान शंकरांची पुरातन मूर्ती होती. सोनूने तात्काळ याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करून भगवान शंकराची मूर्ती सापडल्या त्या ठिकाणी शोधमोहीम करण्याचे निर्देश दिले. या शोधमोहीमेमध्ये देवी-देवतांच्या 42 पुरातन मूर्ती आढळून आल्या. या सर्व मूर्ती वेगवेगळ्या धातूंपासून तयार करण्यात आलेल्या आहेत. देवी-देवतांच्या मूर्तीसह या ठिकाणी पुजेमध्ये वापरले जाणारे शंख, तांब्याचे दिवे आणि त्रिशूळही सापडले आहेत.

idol1

आसाम पोलीसमध्ये नव्यानेच नियुक्त झालेले पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता आणि पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी रविवारी या भागाला भेट दिली. ‘सर्व मूर्ती आणि इतर साहित्य या ठिकाणी कसे पोहोचले याचा तपास सुरू आहे. या ठिकाणी आणखी काही मूर्ती सापडण्याची शक्यता असून शोधमोहीम सुरू आहे’, असे महंता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच पुरातन मंदिरांमधून चोरी करून या मूर्ती येथे लपवून ठेवल्या असाव्यात अशीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे.