युवक काँग्रेस अध्यक्ष छळवणूक करत असल्याचा महिला पदाधिकाऱ्याचा आरोप, वरिष्ठांना कळवूनही कारवाई होत नसल्याचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युवा काँग्रेसचा राष्ट्रीय प्रमुख आपली छळवणूक करत असल्याचा आरोप एका महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. याबाबत वरिष्ठांना कळवूनही कारवाई होत नसल्याचा दावा देखील सदर महिलेने केला आहे.

या महिलेचं नाव अंगकिता दत्ता असं आहे. ती आसाम युवक काँग्रेसची अध्यक्षा आहे. तिने केलेल्या आरोपांनुसार, युवक काँग्रेसचा राष्ट्रीय प्रमुख श्रीनिवास बी. व्ही. हा तिची छळवणूक करत आहे. फक्त महिला आहे, म्हणून श्रीनिवास आपल्यासोबत भेदभाव करत असून त्याने मारहाण देखील केली आहे. याबाबत तिने ट्वीट करून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना माहिती दिल्याचा दावा केला आहे.

दत्ता हिच्या ट्विटनुसार, एक पुरुष वर्चस्ववादी विचारसरणीचा माणूस भारतीय युवक काँग्रेसचं नेतृत्व कसं काय करू शकतो? असा माणूस जो सतत एका महिलेला अपमानित करून मारहाण करतो. प्रियंका गांधी यांच्या लडकी हूं लड सकती हूं या घोषणेचं काय झालं. मी तक्रार करूनही श्रीनिवास याच्याविरुद्ध कोणतीही चौकशी समिती स्थापन करण्यात आली नाही. राहुल गांधी, ही खरंच सुरक्षित जागा आहे का? प्रियंका गांधी देखील महिलांच्या प्रश्नांबाबत बोलतात. पण, मी गेले अनेक महिने त्याच्या विरोधात कारवाईची प्रतीक्षा करत आहे, पण कुणीही त्यात स्वारस्य दाखवलेलं नाही. श्रीनिवास हा त्याच्या चांगल्या कामांच्या जाहिरातीमागे आपली वाईट कृत्य लपवत आला आहे, असा आरोप अंगकिता दत्ता हिने केला आहे.

मला राहुल गांधी यांच्यावर खूप विश्वास होता. श्रीनिवासकडून होणारा छळ आणि अपमान यांच्याविषयी बोलण्यासाठी मी भारत जोडो यात्रेदरम्यान जम्मू येथे गेले होते. आता हा एप्रिल महिना आहे आणि त्याच्या विरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही, असा दावा देखील अंगकिता दत्ताने केला आहे.