तेलंगणात काँग्रेस… मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ; तीन राज्यांमध्ये भाजपास छप्पर फाडके!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांचे एक्झिट पोलचे अंदाज सपशेल फोल ठरले असून या तिन्ही राज्यांत भाजपने ‘छप्पर फाडके’ यश मिळवले आहे. मध्य प्रदेशमध्ये सत्ता कायम राखतानाच भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्ये जिंकली आहेत. तीन राज्यांत गणित चुकले असताना तेलंगणात मात्र जोरदार मुसंडी मारत काँग्रेसने के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची 10 वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. या विजयाने काँग्रेसने कर्नाटकनंतर दक्षिणेतील आणखी एक राज्य काबीज केले आहे.

एक्झिट पोलचा बाजार उठला

एक्झिट पोलचा पुन्हा एकदा बाजार उठला आहे. तेलंगणा वगळता इतर राज्यांबाबत एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलेले अंदाज पूर्णपणे चुकले आहेत. मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होईल आणि काँग्रेसकडे सत्ता जाईल, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता राखेल तर राजस्थानात अटीतटीची लढाई होईल, असे बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष निकालांत भाजपने तिन्ही राज्यांत स्पष्ट बहुमत मिळवले.

तेलंगणाचे डीजी निलंबित!

आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवून तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली. मतमोजणी सुरू असतानाच अंजनी कुमार यांनी राज्याचे नोडल अधिकारी संजय जैन आणि महेश भागवत यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार असलेले प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील ही दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची भेट पोलीस अधिकाऱयांना भोवली आहे.

जनादेश मान्य, लढत राहणार

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत, असे नमूद करतानाच विचारधारेची लढाई यापुढेही लढत राहणार, असे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. तेलंगणातील दणदणीत विजयाबद्दल त्यांनी तेथील जनतेचे आभार मानले तसेच ‘प्रजालु तेलंगणा’चा शब्द आम्ही पूर्ण करणार अशी हमी राहुल यांनी दिली.

तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत.

– मिझोराममध्ये उद्या मतमोजणी होणार आहे. तिथे विधानसभेच्या
40 जागा असून 21 हा बहुमताचा आकडा असणार आहे.