गलवान खोऱ्यातील संघर्षात 38 चिनी जवान नदीत बुडाले, ऑस्ट्रेलियाच्या वर्तमानपत्राचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

15 जून 2020 ला लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. या संघर्षात चीनचेही जवान ठार मारण्यात हिंदुस्थानी जवानांना यश आलं होतं, चीनने आपले 4 जवान या संघर्षात ठार झाल्याचं म्हटलं होतं. असं असलं तरी मृत्यूमुखी पडलेल्या चिनी जवानांचा आकडा हा बराच मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. हाडं गोठवणारी थंडी आणि अंधाराचा फायदा घेत चिनी सैनिकांनी हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हिंदुस्थानी जवानांनी हाणून पाडला होता. या संघर्षानंतर हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते.

ऑस्ट्रेलियामधील वर्तमानपत्र क्लक्सॉनने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की या संघर्षावेळी किमान 38 चिनी सैनिक हे गलवान नदीत बुडाले होते. गलवान नदी ओलांडून माघारी जात असताना हे सैनिक बुडाल्याचं या बातमीत म्हटलं आहे. ही बातमी अत्यंत सखोल संशोधनानंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अज्ञात सोशल मीडिया संशोधकाने हे संशोधन केलं असून त्याने चिनी ब्लॉगर्स, चीनमधील काही नागरिकांकडून मिळालेली खात्रीलायक माहिती आणि चिनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाच्या आधारे क्लक्सॉनने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

15 जून रोजी हिंदुस्थानी जवान गलवान खोऱ्यातील अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. तिथे त्यांचा सामना चिनी कर्नल की फाबाओ आणि 150 चिनी सैनिकांशी झाला होता. चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याऐवजी चिनी सैनिकांनी युद्धाचा पवित्रा स्वीकारला होता. फाबाओने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता हिंदुस्थानी सैनिकांनी त्याला धरला होता. त्याला सोडवण्यासाठी चिनी सैनिकांनी स्टीलचे पाईप, दांडके आणि दगडांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा मुकाबला करणाऱ्या हिंदुस्थानी सैनिकांनी 3 चिनी जवानांना यमसदनी पाठवले होते. हे पाहून घाबरलेले चिनी सैनिक पळायला लागले होते. त्यांनी गलवान नदी ओलांडून आपल्या हद्दीत परत जायचं ठरवलं होतं. या प्रयत्नात किमान 38 सैनिक बुडाले होते असं क्लक्सॉनने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलं आहे.