
समना प्रतिनिधी । नगर
महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधीच नगर शहरात हाणामारीच्या घटनांनी तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच त्यानंतर काही वेळातच सारसनगर परिसरात आणखी दोघांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. मयूर राऊत व दुर्गेश सानप अशी त्यांची नावे असून राऊत याची प्रकृती चिंताजनक आहे. हे दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणी विजय रासकर याच्यासह सहा जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. राजकीय वादातून परस्परांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या घटना शनिवारी सायंकाळी घडल्या आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यानंतर काही वेळातच सारसनगर परिसरात देघांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय रासकर यांच्यासह पाच ते सहा जणांनी हा हल्ला केल्याची फिर्याद सानप यांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी मात्र हा प्रकार निवडणुकीच्या वादातून नव्हे तर जुन्या वादातून घडल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे जखमी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते असून हल्लेखोर भाजप नेत्यांशी संबंधित आहेत.




























































