पावसाने पुन्हा धडकी भरवली, मराठवाड्यावर आभाळ फाटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाडय़ावर आभाळच फाटले आहे. गेल्या 24 तासांपासून पावसाने संततधार लावल्याने गोदावरी, बिंदुसरा, सिंदफणा, मांजरा, तेरणासह कुंडलिका, कयाधू, मनकर्णिका, दुधना नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. गोदावरी नदीवरील सर्व बंधारे तुडुंब भरले असून काठावरील गावांचा महापुराच्या भीतीने थरकाप उडाला आहे. पावसाच्या रौद्र रुपामुळे लाखो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच फुलशेती आणि पिकांना जबर तडाखा बसला आहे.

विष्णुपुरी, लिंबोटी, सिद्धेश्वर, दुधना, येलदरी, माजलगावसह इतर लहानमोठय़ा धरणांचे दरवाजे उघडून नदीपात्रात प्रचंड विसर्ग करण्यात येत आहे. गोदापात्र फुगले असून बॅकवॉटरमुळे नांदेड जिह्याला कोणत्याही क्षणी महापुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, जालना, संभाजीनगर, हिंगोली, लातूर तसेच धाराशीव जिह्यात अखंड पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दापोली जलमय, चिपळुणात थैमान

मुसळधार पावसाने पुन्हा एकदा चिपळूणसह जिल्हावासीयांच्या मनात धडकी भरवली आहे. दापोली आणि चिपळूणचा परिसर जलमय झाला असून दापोलीत 24 तासात रेकॉर्डब्रेक 336.6 मिमी पाऊस पडला. त्यामुळे शेतीही आडवी झाली असून अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या सावटाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिह्यात गेल्या 24 तासातली सरासरी 156 मिमी. तर एकूण 1404.90 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. हिंदुस्थानी हवामान खाते कुलाबा, मुंबई यांच्याकडून 7 ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान रत्नागिरी जिह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षितता आणि सावधानता बाळगण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत.

रायगड, रत्नागिरीला रेड अॅलर्ट

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिह्याला तर रेड अॅलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या दोन जिह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. चिपळूणमध्ये पाऊस थांबला नाही तर पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे.