ठाणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे भाडे परवडेना; चार रुपयांची भाडेवाढ द्या, युनियनचे आरटीओला पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणेकरांचा रिक्षा प्रवास आता लवकरच महागणार आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीमुळे चालकांना भाडे परवडत नसल्याने रिक्षा-टॅक्सी युनियनच्या संयुक्त कृती समितीने भाडेवाढीची मागणी केली आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) पत्र दिले आहे. रिक्षाचालकांना प्रतिकिलोमीटर किमान चार तर पुढील एक किलोमीटरकरिता दोन रुपयांची दरवाढ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास महागण्याची चिन्हे आहेत.

आधीच महागाईमुळे कंबरडे मोडले असताना त्यात रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ होणार असल्याने ठाणेकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. शहरातील टॅक्सी आणि रिक्षाचालक-मालक गेल्या काही दिवसांपासून भाडेवाढ करण्यासाठी आग्रही होते. दररोज सीएनजीचे भाव वाढत आहेत. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीचालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सध्या सीएनजीचे दर 84 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने वाहनधारकांचे व चालकांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळेच भाडेवाढ करण्यासाठी टॅक्सी आणि रिक्षाचालक पेटून उठले आहेत. शहरात सुमारे आठ लाख वाहने सीएनजीवर चालतात. यामध्ये साधारण दोन लाख रिक्षा, एक लाखाहून अधिक टॅक्सी आणि पाच लाखांहून अधिक खासगी कारचा समावेश आहे.

घोडबंदरसथील नोकरदारांच्या खिशाला कात्री
वाढती महागाई आणि सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालकांनी दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर पट्ट्यात प्रवास करणाऱ्या नोकरदारांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. ठाणे स्टेशनवरून कासारवडवली येथे सीटने गेल्यास सध्या 60 रुपये मोजावे लागतात. भाडेवाढीनंतर त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

“आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना आता रिक्षाचे भाडे वाढल्यास सर्वसामान्य माणूस आणखीन भरडला जाणार आहे…” — केतन पाटील (प्रवासी)

“घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आणि आता त्याचबरोबर सीएनजीचे दर वाढले आहेत…” — मेघा शेडगे (गृहिणी)

“आम्ही दररोज ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट असा शेअर रिक्षाने प्रवास करतो…” — ओमकार भिसे (नोकरदार)

“मागील काही वर्षांत सततची वाढणारी महागाई, सीएनजीचा वाढणारा दर, वाहनांच्या वाढलेल्या किमती, वाहनांची दुरुस्ती-देखभाल खर्च, बँक कर्ज, रिक्षाचालकांची मेहनत विचारात घेऊन भाडेवाढ करण्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. तरी खुद्दआ समितीने निश्चित केलेल्या सूचनांनुसार दरवाढीचा निर्णय लवकर घेण्यात यावा. टॅक्सी व ऑटो रिक्षा भाडेदरात नियमानुसार मिळणाऱ्या हक्काची दरवाढ तात्काळ जाहीर करावी.” — विनायक सुर्वे (अध्यक्ष-रिक्षा-टॅक्सी युनियन)