
सामना प्रतिनिधी । मुंबई
पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने रिक्षा, टॅक्सी संघटनांनीदेखील दरवाढीची मागणी केली आहे. ऑटो-रिक्षाचे किमान भाडे १८ रुपये तर टॅक्सीचे भाडे २२ रुपये असून त्यात प्रत्येकी दोन रुपये वाढविण्याची मागणी केली आहे. खटुआ समितीऐवजी हकीम समितीच्या अहवालानुसार भाडेवाढ करावी, अशी मागणी होत आहे. मात्र प्रवासी – ग्राहक पंचायतीने या भाडेवाढीस विरोध केला आहे.
ऑटो-रिक्षा, टॅक्सीप्रमाणे खासगी टॅक्सीचे भाडे निश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने नेमलेल्या हकीम समितीला राज्य सरकारने बरखास्त केले होते. त्यानंतर नेमलेल्या खटुआ समितीचा अहवाल अद्याप सरकारने मान्य केलेला नाही. या अहवालासंदर्भात खासगी टॅक्सी कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे अद्याप रिक्षा, टॅक्सीसाठी कोणतेही नवीन भाडेसूत्र लागू झालेले नाही.
गेल्या दोन वर्षांत सीएनजीचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत. खटुआ समितीचा अहवाल अमलात आलेला नसल्याने त्यापूर्वीच्या खटुआ समिती अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई ऑटो-टॅक्सी मेन्स युनियनचे शशांक राव यांनी केली आहे. मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल. क्वाड्रोस यांनीही टॅक्सीसाठी तीन रुपये वाढीची मागणी केली आहे. मात्र रिक्षाच्या किमान अंतरासाठी २० रुपये मोजणे हा मापदंड अयोग्य असून त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर महागाईचा आणखी भार पडेल. रिक्षा, टॅक्सीचे दर वाढल्यास शेअर रिक्षाचेही दर वाढतील. आधीच हे दर तुलनात्मक दृष्टीने अधिक असल्याने तशी वाढ न करण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. बेस्ट बसचे दोन कि.मी.साठी आठ रुपये, ४ कि.मी.साठी १० रु., ६ कि.मी.साठी १५ रु. ८ कि.मी.साठी १८ रुपये तिकीट दर आहे.


























































