
अपघातादरम्यान चालक किंवा प्रवाशाला गंभीर दुखापतीपासून वाचवता येऊ शकते या संकल्पनेतून 1980 च्या दशकात एअर बॅग ही प्रणाली विकसित झाली. मात्र अलीकडच्या काळात या एअर बॅगचे महत्त्व वाढले आहे. नवीन येणाऱ्या मध्यम प्रकारातील प्रत्येक वाहनात दोन ते सातपर्यंत एअर बॅग असतात. अनेक मोठ्या अपघातात या बॅगमुळे अनेकांचे जीव वाचल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे सुरक्षा कवच म्हणून अलीकडे एअर बॅगकडे पाहिले जाते. आतापर्यंत एअर बॅग फक्त आपल्याला चारचाकी वाहनांमध्येच दिसले आहे. मात्र आता हे फीचर आपल्याला दुचाकीतही पाहायला मिळणार आहे.
रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन Piaggio आणि Autoliv यांनी दुचाकींसाठी एअर बॅग हे फीचर तयार करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपनी मिळून एअर बॅग बनवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. असे असले तरी ऑटोलिव्हने आधीच अॅडव्हान्स सिम्युलेशन टूल्सद्वारे या सुरक्षा फीचरची प्रारंभिक संकल्पना विकसित केली आहे. ज्याची क्रॅश टेस्टही झाली आहे. आता पियाज्जो गृप सोबत ऑटोलिव्ह हे उत्पादन आणखी विकसित करण्याचा प्रयत्न करेल आणि भविष्यात हे उत्पादन लवकरच बाजारात सादर करणार आहे.
दरम्यान, हे नवीन फीचर दुचाकीमध्ये कसे बसवले जाईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र एअर बॅग दुचाकीच्या फ्रेमवर बसवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. जगभरात रस्ते सुरक्षा लक्षात घेता दोन्ही कंपनीने उचलले हे पाऊल कौतुकास्पद आहे. याचा दुचाकी चालकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच यामुळे भविष्यात अपघात घडल्यास अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे.



























































