
ओला लवकरच आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक स्कूटर हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करणार आहे. ही स्कूटर पुढील काही आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने आपल्या या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरू केली आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करू शकतात.
अलीकडेच कंपनीचे को-फाऊंडर भाविश अग्रवाल यांनी ओलाच्या अपकमिंग स्कूटरच्या काही खास फीचर्स बद्दल माहिती सांगितली होती. यात अॅप-आधारित कीलेस ऍक्सेस सारखे फीचर्स मिळणार असल्याचे ते म्हणाले होते. ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अॅलॉय व्हील्ससह डिजिटल इंस्ट्रमेंट कन्सोल मिळेल, असे बोलले जात आहे. त्याचबरोबर यात रिमूवेबल लिथियम-आयन बॅटरी, क्लाऊड कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देखील दिले जाऊ शकते. तुम्ही फक्त 499 रुपयांत ही स्कूटर बुक करू शकता.
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 18 मिनिटांत 0 ते 50% पर्यंत चार्ज होईल. इतक्या चार्जिंमध्ये ही स्कूटर 75 किमीपर्यंत धावेल. तर फुल्ल चार्जिंमध्ये ही स्कूटर 150 किमीचा पल्ला गाठू शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यन, ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर Etergo Appscooter वर आधारित असेल. जे Etergo कंपनीने सादर केलेले इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही स्कूटर नेदरलँडमधील स्टार्ट-अप कंपनीने बनवली आहे. ही कंपनी आता ओलाने खरेदी केली आहे. Etergo प्लॅटफॉर्मचा हिंदुस्थानात Ola स्कूटर बनवण्यासाठी वापर करण्यात आला आहे.



























































