Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर ‘या’ दिवशी होणार लॉन्च, देशातील 400 शहरांमध्ये असेल चार्जिंग स्टेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Ola लवकरच हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. याबाबत गुरुवारी ओलाने घोषणा केली आहे. इतकेच नाही तर कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 400 शहरांमध्ये चार्जिंग पॉइंट्सही तयार करणार आहे. आज आम्ही तुम्हाला याच स्कूटर आणि याच्या लॉन्चिंग बद्दल अधिक माहिती सांगणार आहोत.

गेल्या वर्षी ओलाने 2400 कोटींची गुंतवणूक करत तामिळनाडूमध्ये पहिला इलेक्ट्रिक स्कूटर कारखाना सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. या कारखान्याच्या निर्मितीमुळे सुमारे 10000 रोजगार निर्माण होतील. ही जगातील सर्वात मोठी स्कूटर उत्पादन कंपनी असेल, ज्यामध्ये दरवर्षी 20 लाख स्कूटर तयार केले जातील, असे कंपनीने सांगितले होते.

ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर जबरदस्त फीचरसह लॉन्च होणार आहे. कंपनीने अद्याप याची किंमत जाहीर केलेली नाही. याबाबत माहिती देताना कंपनीचे ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांचे अवलंब करण्यासाठी मजबूत चार्जिंग नेटवर्क आवश्यक आहे. आमचे हायपरचार्जर नेटवर्क सर्वात मोठे चार्जिंग नेटवर्क असेल ज्यामध्ये दुचाकी चार्ज करण्याची सुविधा असेल. हे चार्जिंग नेटवर्क देशभरातील 400 शहरांमध्ये निर्माण केले जाईल. ज्यामध्ये ग्राहक त्यांचे इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करू शकतील. या चार्जिंग नेटवर्कमध्ये 100000 चार्जिंग पॉईंट्स असतील. दरम्यान, कंपनी जुलै 2021 मध्ये आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार असल्याचे जाहीर केले आहे.