आयुर्वेद, रेस्टॉरंट, वेबसाईट अन् बरेच काही… मराठी उद्योजकाची बहुआयामी कामगिरी

जेवण करताना आपण चौरस आहार अशी संकल्पना वापरतो. तशाच पद्धतीने एखाद्या उद्योजकाचे बहुआयामीपण काय असावे, तर तो एकाच वेळी वैविध्यपूर्ण, तरीही लोकरुची जपणारे व्यवसाय करतो. ठाण्यातल्या किरण भिडेंचा जीवनप्रवास हेच सांगून जाणारा आहे.

या प्रवासाविषयी किरण भिडे म्हणाले, इंजिनीअरिंग, एमबीए अशी शैक्षणिक वाटचाल करत मी नेटवर्क मार्केटिंग कंपनीत 1998 ला जॉइन झालो, तेव्हाच वेगळेपणाचं बीज मनामध्ये रोवले गेले आणि 1999 मध्ये वैद्य साने आयुर्वेद लॅब आम्ही सुरू केली.

मी, माझा भाऊ आणि डॉ. माधव साने या तिघांनी माधवबाग सुरू केली. 2004 ला डॉ. माधव यांचं निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉ. रोहित साने यांनी त्यांचा हा आरोग्यसेवेचा यज्ञ अविरत सुरू ठेवलाय. ज्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोतच.

‘माधवबाग’चं 2006 ला पहिले क्लिनिक सुरू झाले. त्यानंतर आजच्या घडीला 10 राज्यांमध्ये साडेतीनशेहून अधिक केंद्रे, 400 हून अधिक डॉक्टर्ससह 1200 हून कर्मचारी वर्ग आमच्याकडे कार्यरत आहे.
‘माधकबाग’ची ही वाटचाल सुरू असतानाच एखादे मराठमोळे रेस्टॉरंट असावे, हा विचार मनात घोळू लागला आणि जन्म झाला ठाण्यातल्या ‘मेतकूट’ या मराठमोळ्या रेस्टॉरंटचा.

राज्यातले पाच प्रादेशिक विभाग म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा. अशा ठिकठिकाणच्या पदार्थांचा मेळा या रेस्टॉरंटमध्ये भरतो. आज रेस्टॉरंटमुळे 100 जणांना रोजगार उपलब्ध झालाय. या शाकाहारी रेस्टॉरंटला उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर ‘काठ अन घाट’ या लोकाग्रहास्तव निर्माण झालेल्या नॉन व्हेज स्पेशल हॉटेलची चवही लोकांना खूप आवडली. सारे काही छान सुरू होते. इतक्यात मधल्या काळात या हॉटेलला मोठी आग लागली. आमची मेहनत जळून जाताना काळजाचे पाणी झाले. तरीही नाउमेद न होता आम्ही निर्धाराने पुन्हा हे रेस्टॉरंट सुरू करण्याचे ठरवलंय. त्यादृष्टीने पावले टाकायलाही सुरुवात केलीय.

माधवबाग, मेतकूट, दोन्ही वेबसाईट अशा चार विविध प्रोजेक्टस्वर काम करण्याचा माझा अनुभव मला व्यावसायिक म्हणून तसेच माणूस म्हणूनही विलक्षण शिकवून गेलाय, असे भिडे सांगतात.

परीक्षेच्या काळात शोधले उत्तर – किरण भिडे यांनी मराठी साहित्यप्रेमातून ‘पुनश्च डॉट कॉम’ ही केबसाईट साकारली. अनेक लेख, अनेक लेखक यांना मंच उपलब्ध करुन दिला. या लेखकांना मानधनही दिले जायचे हे सगळे सुरु असताना 2020 उजाडले आणि कोरोनाने साऱया जगाला हादरा दिला. आर्थिक गणितं बदलली, आयुष्य बदलली. सर्कांसाठीच हा परीक्षेचा काळ होता. त्याकर उत्तर शोधणेही गरजेचे होते. भिडे यांनीही ते त्यांच्या परीने शोधले आणि ‘ध्यानीमनी डॉट कॉम’ केबसाईटच्या रूपात गुंतकणूककिषयक मार्गदर्शन करणाऱया ऑनलाईन पोर्टलची नांदी झाली.

उद्योग व्यवसायांचे जमवलेले मेतकूट
एखाद्या कंपनीची जडणघडणीची वर्षे असतात. माणसासारखीच तिच्या आयुष्यातही बाल्य, किशोर, तरुण, प्रौढत्व आणि वृद्धत्व अशी अवस्था येते. त्या प्रत्येक टप्प्यावर लीडरकडे लागणारे स्वभावविशेष प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही. हीच बाब लक्षात घेत मी एखादा व्यवसाय सुरू होऊन तो स्थिरस्थावर झाल्यावर एखादी समस्या किंवा प्रश्न विचारात घेऊन त्याच्या अवतीभवती काही उद्योग व्यवसाय तयार होतो का, याचा रिसर्च करतो आणि तशी पावले टाकतो. म्हणजे नवा व्यवसाय सुरू करताना जुना व्यवसाय पूर्णपणे सोडून न देता तो सुरू ठेवायचा. त्यातून अलगद बाजूला होऊन दुसरीकडे आपला वेळ, विचारशक्ती गुंतवायची. नवा व्यवसाय साकारायचा असे माझे साधेसोपे लॉजिक आहे. या प्रवासात अडचणी आल्या, संकटे आली तरी त्यातून मार्ग काढायचा.

आपल्या उद्योग व्यवसायांचे जमवलेले हे मेतकूट उदयोन्मुख उद्योजकांची उद्योग व्यवसायांप्रति रुची वाढवणारे ठरेल, असा विश्वास किरण भिडेंनी व्यक्त केलाय.

>> अश्विन बापट
(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)