बाबा नित्यानंदने बेट विकत घेऊन केली स्वतंत्र देशाची स्थापना!

5364

बलात्काराच्या आरोपानंतर देशाबाहेर पळालेला स्वयंघोषित बाबा नित्यानंद स्वामीने कमालच केली. दक्षिण अमेरिकेत एक बेट विकत घेऊन त्याला स्वतःचा देश म्हणून घोषित केले आहे. या स्वतंत्र देशाचे नाव ‘कैलासा’ ठेवण्यात आले असून हे हिंदू राष्ट्र असल्याचे जाहीर केले आहे. ‘कैलासा’ नावाने एक वेबसाइटही बनविण्यात आली आहे.

तामीळनाडूचा नित्यानंद स्वामी हा वादग्रस्त स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आहे. काही वर्षांपूर्वी त्याचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी आश्रमातील महिलेवर बलात्काराचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. गुजरातमध्ये लहान मुलामुलींना आश्रमात डांबून ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आले, मात्र दहा दिवसांपूर्वी नित्यानंद देशाबाहेर पळाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली होती. धक्कादायक म्हणजे स्वतःचा पासपोर्ट नसताना नित्यानंद देशाबाहेर फरार झाला. नित्यानंदच्या शोधासाठी रेडकॉर्नर नोटीस बजावली असताना आता खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. नित्यानंदने स्वतःचा स्वतंत्र देशच स्थापन केला आहे.

कसा आहे ‘कैलासा’

  दक्षिण अमेरिकेतील एक देश इक्वॅडोरमध्ये एक बेट नित्यानंदने विकत घेतले आणि त्याला ‘कैलासा’ नाव दिले. ‘कैलासा’ हे बेट त्रिनिदाद आणि टोबॅगो देशांच्या जवळ आहे.

  नित्यानंदने स्वतंत्र देश ‘कैलासा’साठी विविध पदांवर लोकांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधानपदावर ‘माँ’ची नियुक्ती केली. ती एक दक्षिण हिंदुस्थानी अभिनेत्री असल्याचे समजते. तसेच कॅबिनेट मंत्री, लष्करप्रमुख, इतर मंत्र्यांचीही नियुक्ती केली आहे.

 या देशासाठी स्वतंत्र ध्वज आहे. राष्ट्रीय प्राणी नंदी म्हणून घोषित केला आहे. राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय वृक्ष याची घोषणा केली आहे.

 ज्याला या देशाचे नागरिक व्हायचे असेल त्याला देणगी देऊन येता येईल. ‘कैलासा’ हे हिंदू राष्ट्र आहे. मानवता हा या देशाचा धर्म आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणे देशाचा कारभार चालेल असे वेबसाइटवर म्हटले आहे.

 क्रिकेटपटू अश्विनच्या ट्विटने चर्चेला उधाण

क्रिकेटपटू आर. अश्विनने ट्विट करीत ‘कैलासा’ला जाण्यासाठी  व्हिसा घेण्याची काय प्रक्रिया आहे अशी विचारणा केली आहे. त्यामुळे नित्यानंदच्या नव्या देशात अश्विन जाणार की काय, अश्विनने केवळ चौकशी केली आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या