अमित शहा तुम्हाला कायदा मोडायला सांगतात का? सभेच्या परवानगीवरून बच्चू कडूंचा पोलिसांसोबत वाद

अमरावतीमधील सभेच्या मैदानावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद उफाळल्याचं दिसून आलं. कडू यांना आधी सभेसाठी परवानगी देऊन मग अमित शहांच्या सभेसाठी ती नाकारण्यात आल्याने बच्चू कडू यांनी पोलिसांशी वाद घालत त्यांना खडेबोल सुनावले.

आमदार बच्चू कडू यांना सभेसाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात येऊन त्याच ठिकाणी अमित शहांच्या सभेला परवानगी देण्यात आली. त्यामुळे बच्चू कडू यांनी पोलिसांसोबत वाद घालून प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. तसंच, पोलिसांना कायदा मोडायला अमित शहा सांगतात का? असा प्रश्न विचारून कडू यांनी भाजपच्याच इशाऱ्यावरून हे सगळं होत असल्याचा आरोप केला.

अमरावती येथील सायन्स कोर मैदानावर 24 एप्रिल रोजी सभा घेण्यासाठी बच्चू कडू यांनी पैसे भरून बुकिंग केलं होतं. मात्र, याच मैदानावर अमित शहा यांची सभा होणार आहे. त्यासाठीची तयारीही भाजपने सुरू केली. दरम्यान मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या बच्चू कडू यांना पोलिसांनी मैदानाचे गेट बंद करत त्यांना गेटवरच रोखलं. त्यावेळी पोलिसांसोबत कडू यांचा वाद झाला. सुरक्षेच्या कारणास्तव सभा रद्द करण्याचं कारण पुढे करताच बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. ज्या ठिकाणी आपल्याला सभेसाठी परवानगी देण्यात आली होती, त्याची कागदपत्रेही असताना त्याच मैदानावर आता अमित शहांच्या सभेला परवानगी कशी काय मिळते, असा सवाल कडू यांनी उपस्थित केला.

पोलिसांसमोरच बच्चू कडूंनी सभेच्या परवानगीचं पत्र फाडलं. अमित शाहांच्या सुरक्षेचं कारण देऊन आमची सभा रद्द करता, तुम्ही कायद्या बाबत बोलू नका, तुम्ही कायदा चुलीत घातला. सुरक्षेच्या कारणास्तव अमित शाह कायदा आणि सुव्यवस्था मोडणार का? असा प्रश्न विचारतानाच पोलिसांनी आपल्या गाडीवर भाजपचे झेंडे लावावेत, त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं होतंय, असा थेट आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला.