हनुमानजींनी लाथ मारून अमित शहांच्या सभेचा मंडप पाडला! बच्चु कडूंचा खोचक टोला

अमरावती लोकसभा मतदार संघात सभेच्या मैदानावरून वाद उफाळला होता. आधी सभेला परवानगी देऊन नंतर पोलिसांनी ती नाकारल्याने बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झडली. दरम्यान, अमित शहा यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचा काही भाग वादळी वाऱ्यामुळे कोसळला. त्यावरून बच्चू कडू यांनी खोचक टोला लगावला आहे.

अमरावतीतील सायन्स कोर मैदानातील सभेवरून मंगळवारी बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद झाला. बच्चू कडू यांनी आधी या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी घेतली होती. मात्र, ऐनवेळी ती नाकारून बच्चू कडू यांना मैदानावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. त्यामुळे बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत मैदानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं.

दरम्यान, मैदानावर अमित शहा यांच्या सभेची तयारी सुरू असताना मुख्य मंडपाच्या बाजूचा मांडव वादळी वाऱ्यामुळे कोसळला. मंगळवारी असलेल्या हनुमान जन्मोत्सवाचा संदर्भ देत बच्चू कडू यांनी टोला हाणला आहे. ते म्हणाले की, हनुमानजींनी काम दाखवलं, एक लाथ मारली आणि मंडप पाडला. त्यांची चालीसा राजकीय होती, तुमची ही जबरदस्ती सुरु आहे. त्यावर हनुमानजीही बोलत आहेत, हे नाही चालणार. देव आमच्यासोबत आहे. इथे कायदा काही राहिलेला नाही. पोलीस अधिकारी भाजपसारखे बोलत आहेत. आम्हाला भाजपचं ऐकावं लागेल असं सांगत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.