पुसदमध्ये कब्रस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था; दफनासाठी जाताच येत नसल्याने नागरिकांमध्ये संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

एकीकडे शहर स्मार्ट होत आहेत.मात्र, अनेक गावात रस्तेही नाहीत. त्यामुळे नागिरकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. पुसद तालुक्यातील बेलोरा येथे कब्रस्थानतडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. आजूबाजूला झुडपे वाढल्याने रस्ता अरुंद आहे. त्यातून चालणेही शक्य होत नाही. त्यामुळे गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला दफनासाठी कब्रस्थानपर्यंत नेणे कठीण होते. त्यामुळे या रस्त्यातील झुडपे हटवून कब्रस्थानपर्यंतचा रस्ता बनवून द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने अखेर नागरिकांचा संयम संपला आणि त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

बेलोरा येथील रहिवाशी सय्यद बिबन भाई यांची आई राशद बी सय्यद बुद्दु यांचे निधन झाले. गावापासूनच जवळ असलेल्या दस्तगीर येथे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. संध्याकाळी कब्रस्तानमध्ये मृत्यूदेह दफन करण्यासाठी ते निघाले होते. कब्रस्थानपर्यंतचा रस्ता अतिशय अरुंद आणि खड्डेमय आहे. रस्त्याच्या आजूबाजूला झुडपांचे जंगल वाढले आहे. या रस्त्याने चालणेही कठीण असल्याने त्यांना मृत्यूदेह कब्रस्तानपर्यंत नेता आला नाही. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. रस्ता मोकळा करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून निवेदन अर्ज देण्यात आले होते. त्याला केराची टोपली दाखवीत अद्यापपर्यंत कार्यवाही करण्यात आलेली नाही.

रस्ता नसल्याने मृत्यूदेह दफन न करताच नागरिकांनी मृतदेह रस्त्यातच ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लगेच पुसद येथून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी ,खंडाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी आले. गावातील पोलीस पाटील, माजी सरपंच, ग्रामसेवक ,गावातील नागरीक घटनास्थळी हजर झाले. कब्रस्थानपर्यंतचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा, अशी मागणी मुस्लिम समाजातील नागरिकांनी केली. महसूल विभागातील, खंडाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी मध्यस्थी करत येत्या चार दिवसात रस्त्याचे निरीक्षण करणार आणि 15 दिवसात रस्ता मोकळा करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर दुसऱ्या रस्त्याने मृत्यूदेह कब्रस्तानपर्यंत नेऊन दफन करण्यात आला.

रस्त्यासंदर्भात गावात अशा अनेक समस्या आहेत. पावसाळ्यात या कब्रस्तानापर्यंत पोहोचणेही अशक्य होऊन जात. या अरुंद चिखलाच्या रस्त्याने वाट काढणे, कठीण असते. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देत रस्त्यासंदर्भातील समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यात यावे.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.