बदलापूरमध्ये अत्यंत विकृत घटना घडली, दुष्कृत्य घडले त्याचा निषेध करण्यासाठी 24 ऑगस्टला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. हा केवळ राजकीय बंद नाही. कोरोनाविरुद्ध महाराष्ट्र एकत्रितपणे एखाद्या कुटुंबासारखा लढला तशीच आता वेळ आली आहे. घटनाबाह्य सरकारला जमिनीवरचा आक्रोश कळलाच पाहिजे. विकृतीचा निषेध नव्हे, तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी, लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना, माताभगिनी बांधवांना विनंती करतोय. सर्व जण जातपात, धर्म बाजूला ठेवून या बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधला. महाराष्ट्र बंद आंदोलनात कोणताही राजकीय अभिनिवेष नाही, असे स्पष्ट करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याप्रमाणे आपण कोरोनाविरुद्ध लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक वातावरण निर्माण व्हायला हवे. कुणीही असे दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे आणि कुणी असे कृत्य केले तर त्याला तातडीने कठोर शिक्षा होते, ही भीती विकृतांच्या मनात निर्माण होण्यासाठी हा बंद करतोय, असे ते म्हणाले.
मुली सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली, प्रगती झाली याला अर्थ काय?
मुलंबाळं शाळेत जातात त्या शाळेतील मुली सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ तरी काय राहणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. संपूर्ण महाराष्ट्राने आता व्यक्त होण्याची गरज आहे. केवळ राजकारण म्हणून नव्हे तर महाराष्ट्रातल्या माताभगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत ही भावना आणि भूमिका सर्वच पक्षाची असलीच पाहिजे. नाहीतर राजकारणाला काहीच अर्थ नाही, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अत्याचारांसंदर्भात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध बातम्यांचाही दाखला दिला. गेल्या पाच वर्षांत वीस हजार बालिकांवर अत्याचार… असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध… चांदिवलीत चिमुरडीवर अत्याचार… मुंबईत बाल लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ…अशा हेडलाईन्स ऐकवून दाखवतानाच आजही ठाण्यात अशीच एक घटना घडली आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्रेकाचा क्षण आता जवळ आलाय
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या आठवडय़ात पश्चिम बंगालमध्ये रुग्णालयात अत्याचाराची घटना घडली त्याविरुद्ध देशात आगडोंब उसळला. दिल्लीत निर्भया कांड घडले होते त्यावेळीही संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याविरोधात उभा राहिला होता. बदलापुरातील घटनाही तशीच आहे. अशा अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. तो क्षण आता जवळ येत चालला आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
परवापासून बदलापुरात घडतेय तो जनतेचा उद्रेक आहे, जनतेचा उद्वेग आहे. त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी शनिवारचा बंद आहे. हा बंद कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून माताभगिनींच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी आहे. केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी यात यावे असे नाही तर जनतेने स्वत:हून हा बंद पाळला पाहिजे. – उद्धव ठाकरे