मायावतींचा मोठा निर्णय; राजकीय उत्तराधिकारी नेमला….भाच्याकडे दिली पक्षाची कमान

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी रविवारी लखनऊमध्ये झालेल्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये मायावतींनी आपला उत्तराधिकारी कोण असणार याची घोषणा केली आहे. या बैठकीसाठी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना तसेच प्रमुख अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते.

मायावतींनी आकाश आनंद यांचे नाव उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले आहे. आकाश आनंद यांच्याकडे नुकतीच चार राज्यांची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक हे मोठे पद देण्यात आले होते. 2017 साली आकाश आनंद यांनी राजकारणात प्रवेश केला होता. सहारनपूर येथे झालेल्या सभेत आकाश आनंद यांचे मायवतींच्या उपस्थित राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले होते. त्यानंतर सहा वर्षात त्यांची पक्षातील सक्रीयता वाढली होती. आकाश आनंद हे मायवती यांचे भाचे आहेत. मायावती यांचा लहान भाऊ आनंद कुमार यांचे ते पुत्र आहेत.

आकाश आनंद यांचे नाव उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तसेच या निर्णयामुळे बसपात पक्षातंर्गत वाद वाढण्याचीही शक्यता आहे. बसपातील अनुभवी नेत्यांकंडे हे पद न देता मायावतींनी भाच्यालाच पद दिले आहे. याबाबत अद्याप कोणतीही राजकीय प्रतिक्रिया आलेली नसली, तरीही कुजबुज सुरू आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आकाश आनंद यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण झाल्यानंतर बसपा कमकुवत झाल्याचे काही लोकांनी म्हटले आहे. 2017 आणि 2019 मध्ये पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तर 2022 मध्ये पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आनंद यांच्यामुळे बसपाच्या कामगिरीत मोठी घसरण झाल्याची चर्चा आहे.