बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार, मायावती यांची घोषणा

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी येत्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. कोणत्याही आघाडी किंवा युतीत आपण सहभागी होणार नसल्याचंही मायावती यांनी स्पष्ट केलं आहे. माध्यमांनी वारंवार अफवा पसरवू नयेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

ट्विटरवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मायावती म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक आणि चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक बसपा स्वबळावर लढवेल. एनडीए आणि इंडियामध्ये गरीबविरोधी, जातियवादी, धर्मविरोधी, श्रीमंत आणि भांडवलवादी पक्षांचा समावेश आहे. याच धोरणांविरोधात बसपाने नेहमी संघर्ष केला आहे, त्यामुळे त्यांच्याशी युती किंवा आघाडी करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं मायावती यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे माध्यमांनी निष्कारण वावड्या उठवून फेक न्यूज पसरवू नये, असं आवाहन करताना मायावती म्हणाल्या की, बसपा ही विरोधी पक्षात फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा समाजातील असंघटित असलेल्या उपेक्षित, मागास वर्गांना बंधुभावाने जोडण्याच्या विचारधारेवर काम करते. याच विचारधारेच्या माध्यमातून 2007 प्रमाणेच आगामी लोकसभा तसंच, चार राज्यांतील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार आहे, असं मायावती यांनी स्पष्ट केलं.