
सामना ऑनलाईन । बीजिंग
हिंदुस्थानातील बँकिंग क्षेत्रात आणखी एका विदेशी बँकेची भर पडणार आहे. हिंदुस्थानात व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक ऑफ चायनाने मागितलेल्या परवान्याला रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे. या बँकेची पहिली शाखा मुंबईमध्ये सुरू होणार आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेवेळी मोदींनी बँक ऑफ चायनाला हिंदुस्थानात व्यवसाय परवाना दिला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार परवानगीसंदर्भातला सिक्युरिटी क्लिअरन्स अर्ज २०१६ मध्ये करण्यात आला होता.
या परवानगीमुळे बँक ऑफ चायना हिंदुस्थानात व्यवसाय करणारी दुसरी चिनी बँक ठरणार आहे. चायनाची सरकारी बँक हाँगकाँग ऍण्ड शांघाय स्टॉक एक्स्चेंजवर अगोदरच लिस्ट झाली आहे. बँक ऑफ चायनानंतर हिंदुस्थानात व्यवसाय करणाऱ्या विदेशी बँकांची संख्या ४६ वर गेली आहे. युकेची स्टॅण्डर्ड चार्टर्ड ही हिंदुस्थानातील सर्वाधिक १०० शाखा असलेली विदेशी बँक आहे.
– बँक ऑफ चायनाची मार्केट कॅप १०.८४ लाख कोटी आहे. या बॅकेवर इस्रायलवर दहशतवादी हल्ले करणाऱ्या हमास या संघटनेला फंडिंग केल्याचा आरोप होता. या आरोपामुळे या बँकेला परवाना मिळण्यास उशीर झाला.
– इराणच्या ३ दक्षिण कोरियाच्या २ तर नेदरलॅण्ड आणि मलेशियाच्या प्रत्येकी एका बँकेने हिंदुस्थानात शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बॅकेकडे परवानगी मागितली आहे, पण त्यावर अजून निर्णय झालेला नाही.






























































