
क्रीडा जगतात सध्या काही लैंगिक छळाची प्रकरणे गाजत असताना क्रिकेटमध्ये मात्र लैंगिक छळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला आहे. यासाठी ‘लैंगिक छळ प्रतिबंध’ धोरणाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात येणार आहे. 27 मे रोजी अहमदाबाद येथे ही विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. शिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानात होणाऱया विश्वषकाच्या तयारीसाठी ‘वर्किंग कमिटी’चीही स्थापना करण्यात येणार आहे.
‘बीसीसीआय’चे माजी ‘सीईओ’ राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर ‘बीसीसीआय’ने चार सदस्यीय समितीची स्थापना केली होती, मात्र नव्या सुधारित धोरणामुळे सदस्यांची संख्या वाढणार आहे. या वर्किंग कमिटीमध्ये ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कार्यवाहक सीईओ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱयांचा समावेश राहणार आहे. या कमिटीच्या माध्यमातून विश्वचषक सुरू होण्याआधी सर्व स्टेडियम सज्ज ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाहीदेखील वेगाने करण्यात येणार आहे. स्टेडियमच्या सुधारणांसाठी आवश्यक निधीची तरतूदही मंडळाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, याच वर्पिंग कमिटीकडून महिला प्रीमियर लीग आणि राज्य संघांच्या स्पर्धांबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पाच कलमी कार्यक्रम
लैंगिक छळ रोखण्यासाठी ‘बीसीसीआय’कडून पाच कलमी कार्यक्रम तयार करून तो मंजूर करण्यात आला आहे. याच्या अजेंडय़ानुसार पायाभूत सुविधा विकास आणि अनुदान उपसमिती स्थापन करणे, राज्य संघांमध्ये फिजिओथेरापिस्ट आणि प्रशिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, ‘आयसीसी’ विश्वचषक 2023 साठी वर्किंग कमिटीची स्थापना आणि लैंगिक छळ प्रतिबंध यांचा समावेश आहे.




























































