संयम पाळा, वाद टाळा; बीसीसीआयचा कर्णधार कोहलीला ‘विराट’ सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | मुंबई

विंडीजवर एकतर्फी विजय मिळवून टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱ्यावर रवाना झाली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभवाचे पाणी पाजण्यासाठी विराट सेना सज्ज झाली आहे. या दौऱ्यात कर्णधार विराट कोहली याने संयमाने वागावे आणि वाद टाळावा असा विशेष सल्ला बीसीसीआयने दिला आहे.

विराट कोहली हा आक्रमक कर्णधार खेळाडू आहे. मैदानावर फलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना, खेळाडू बाद झाल्यावर विराटची देहबोली अधिक आक्रमक होते. अनेकवेळा या उत्साहात विराट प्रेक्षकांकडे हात, बोट दाखवून इशारा करताना दिसून आला आहे. त्याबाबत त्याला तंबी देखील देण्यात आली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यात त्याच्याकडून कोणताही आततायीपणा होऊ नये यासाठी दौरा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने त्याचे कान टोचले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या मैदानावर विराट सेनेला कडवी टक्कर देण्याची शक्यता आहे. ऑसी खेळाडू स्लेजिंग करण्यात आणि विरोधी संघाच्या खेळाडूंना उकसावण्यात पटाईत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी विराट सेना सज्ज आहे. परंतु बीसीसीआयने वाद टाळण्याचा सल्ला दिल्याने जबरदस्त फॉर्मात असलेल्या कोहली अँड कंपनीला ऑसी खेळाडूंना आपल्या बॅटने, गोलंदाजीची आणि चांगल्या प्रदर्शनाचे उत्तर द्यावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यात टीम इंडियाला विजयाची चांगली संधी आहे. ऑसी संघातील अनेक खेळाडू नवीन असून टीम इंडियाच्या तुलनेत कमी अनुभवी आहेत. तसेच ऑसी संघात अनेक आक्रमक खेळाडूंचा भरणा असला तरी मैदानावर टिकून खेळणाऱ्या खेळाडूंची वानवा आहे. त्या तुलनेत टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तम आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन यजमान संघाला पराभूत करण्याची टीम इंडियाकडे सर्वोत्तम संधी असल्याचे म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वापूर्ण दौऱ्याची सुरुवात 21 नोव्हेंबरला खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्या पासून होणार आहे. या दीर्घ दौऱ्यात टीम इंडिया 3 टी-20, 4 कसोटी आणि 3 एक दिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे.