
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
इंग्लंडमध्ये 31 मेपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर उद्या, 15 एप्रिलला होणार्या ‘टीम इंडिया’च्या निवडीत कोणाला तिकीट मिळणार याकडे तमाम क्रिकटशौकिनांचे लक्ष असेल. महेंद्रसिंग धोनीला बॅकअप म्हणून दुसरा यष्टिरक्षक फलंदाज कोण असेल? याचबरोबर चौथ्या क्रमांकावर कुठल्या फलंदाजाला घ्यायचे? आणि चौथा अतिरिक्त गोलंदाज म्हणून कोणाला खेळवायचे? हा सस्पेन्स सोमवारी संपणार आहे.
अतिरिक्त चौथा गोलंदाज कोण?
इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर अतिरिक्त चौथा गोलंदाज म्हणून कोणाची निवड करायची हा यक्षप्रश्न ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीपुढे असेल. अनुभवी उमेश यादव सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे, तर दुसरीकडे खलील अहमद अद्याप परिपक्व गोलंदाज नाहीये.
रायुडूला प्राधान्य की शंकरला संधी
लोकेश राहुलला संघात स्थान दिल्यास अंबाती रायुडूला चौथा फलंदाज म्हणून संघात घेता येते, मात्र अष्टपैलू विजय शंकरही चौथ्या स्थानासाठी शर्यतीत आहे. न्यूझीलंड दौर्यावर वेगवान मार्याचा शंकरने समर्थपणे सामना केला होता. त्यामुळे रायुडू शर्यतीतून थोडा मागे पडला असून केवळ अनुभव हीच त्याची जमेची बाजू असेल.
रिषभ पंत की दिनेश कार्तिक?
विश्वचषक स्पर्धेसाठीच्या हिंदुस्थानी संघात नव्या दमाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि अनुभवी दिनेश कार्तिक यांच्यात चुरस असेल. पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत 222 धावा फटकावल्या असून दिनेश कार्तिकला फक्त 93 धावा करता आलेल्या आहेत. या दोघांत पंतचे पारडे थोडे जड वाटते. कारण त्याच्यामध्ये पहिल्या सात क्रमांकावर कुठेही फलंदाजी करण्याची क्षमता आहे. याचबरोबर तिसरा सलामीवीर म्हणून लोकेश राहुलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.



























































