सुंदर मी होणार – तन-मन सुंदर

>>शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)

बाह्यरूप खुलवताना…

सौंदर्य वाढविण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही आपापल्या परीने वेगवेगळय़ा प्रकारे प्रयत्न करत असतात. मात्र सौंदर्य खुलविण्याचे जितके उपाय उपलब्ध आहेत ते केवळ शारीरिक बाबींकडेच लक्ष देतात. मात्र शरीरातील प्रत्येक पेशी आतून कशी उजळेल आणि सौंदर्य कसे उत्सर्जित करेल, याचेही प्रयत्न करायला हवेत.

आपण जेव्हा शरीराच्या खाण्यापिण्यावर लक्ष देऊन आंतरिक सौंदर्य जपत असतो, मनाचे सौंदर्य जपत असतो, तेव्हा बाह्य सौंदर्य खुलवितानाच अनेक वेळा आपल्याला थोडय़ाफार मेकअपचीही गरज भासते. अशा वेळेस हलकासा मेकअप किंवा हलकेसे फाऊंडेशन लावून त्यावर पावडर लावल्यास किंवा एखादा कॉम्पॅक्ट वापरल्यास व तुम्हाला सूट होईल अशा रंगाची अगदी लाइट पिंक किंवा अनेक वेळा काहींना आवडत असलेली डार्क ब्राऊन रंगाची, हलक्याशा केशरी रंगाची लिपस्टिकही तुमचे सौंदर्य उजळविण्यास मदतच करेल. अलीकडे डोळय़ांवर फार मेकअप न करता नुसता हलकासा आयलायनरचा वापर केला. डोळय़ांच्या आत हलके काजळ घातले आणि पापण्यांवर हलकासा मस्कारा लावला तर तुमचे डोळे सुंदर व आकर्षित दिसतात. तसेच आपण वावरत असलेल्या ठिकाणी आपल्या शरीराला शोभेल असा, आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेल असा योग्य पेहराव केल्यास आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडल्याशिवाय राहणार नाही.

उत्तम व्यक्तिमत्त्वासाठी आहार, विहार सांभाळतानाच जर तुम्ही हलकासा मेकअप केलात तर तुमचे व्यक्तिमत्त्व जास्त उठून दिसेल. आता तुम्ही म्हणाल की, आतून प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचे, तर भरपूर पाणी प्यायचे, भरपूर घाम गाळायचा, अगदी जमेल तेव्हा योगासने करायची, थोडासा व्यायाम करायचा, अगदी आठवडय़ातून एकदा स्वतःचे भरपूर लाड करताना आपल्या प्रकृतीस योग्य अशा तेलाने हातापायांना, संपूर्ण शरीराचा मसाज करायचा. मनाला जपतानाच चेहऱयाच्या स्नायूंनाही थोडा ताण द्यायचा. उटणी, लेपण यांचा वापर करायचा. ज्यामुळे त्वचा श्वास घेण्यासाठी मोकळी होते, उत्सर्जित होते. तुम्ही योगासने केलीत, ध्यानधारणा केली तर त्वचा उजळून निघतानाच मनही शांत होते.

सौंदर्यासाठी हे असे अनेक उपाय करत असताना एक मात्र नक्की लक्षात ठेवले पाहिजे, ते म्हणजे आपण प्रत्येकानेच आपली प्रकृती, आपली त्वचा ओळखायला शिकले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यावर वेगवेगळे उपाय केले पाहिजेत. कारण प्रत्येकाच्या शरीराचा, प्रकृतीचा, त्वचेचा प्रभाव हा आपल्याला मान्यच करावा लागेल. शारीरिक प्रकृती ही जशी कफ, वात, पित्त या तीन गुणधर्मांची असते आणि या गुणधर्मांवरच अनेक वेळा त्वचेचे वर्गीकरणही होत असते. शारीरिक प्रकृती ही वातप्रकारात मिळत असेल तर त्वचा लवकर कोरडी पडते आणि पित्त प्रकृती असल्यास त्वचा ही सामान्य प्रकारात मोडते. तसेच त्वचा जर तेलकट असेल तर कफ प्रकृती असल्याचे निरीक्षणास येते. त्यामुळेच प्रकृती माहीत असल्यास आपण कोणता आहार घ्यावा, त्वचेला काय लावावे, शरीराची काळजी कशी घ्यावी हे आपल्याला योग्य प्रकारे ठरवता येते. कारण आपण जे खातो तेच आपल्या त्वचेवरही दिसते. म्हणजे जर आपण ताजे स्वच्छ अन्न सेवन केले तर आपली त्वचा तजेलदार राखण्यास मदत होते. पालेभाज्या तसेच समतोल आहार व जीवनसत्व असलेली, प्रथिने असलेली फळे व भाज्या घेतल्यास आपली त्वचा योग्य राहते. तिचा पोत सुधारण्यास मदत होते. भरपूर पाणी प्यायल्यामुळे किंवा पाणी असलेली फळ खाल्ल्यामुळे आपली त्वचा शुष्क पडत नाही.

मनाची-शरीराची काळजी घेण्यासाठी योग्य उपाय, श्वासोच्छ्वास, समतोल आहार, ध्यानधारणा करतानाच त्या त्या ठिकाणी योग्य मेकअप तंत्राचा ताळमेळ राखल्यास तुमचे अंतर्मन उजळून निघेलच, पण तुम्ही अंतर्बाह्य प्रकाशमान व सुंदर दिसाल.

[email protected]