मराठवाडय़ात पावसाचा हाहाकार! बीड, लातूर, जालन्यात अतिवृष्टी; पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसाने आज मराठवाड्यातील बीड, लातूर, जालना, धाराशीव, नांदेड, परभणी जिल्ह्यांना धू-धू धुतले. बीडच्या सात, लातूरच्या नऊ मंडळांत अतिवृष्टी तर जालन्याच्या पाचनवडगाव मंडळात ढगफुटीसदृश 183 मिमी पाऊस, धाराशीवमधील परंडा, नळदुर्ग, तुळजापूर तालुक्यात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे गोदावरी, सिंदफणा, मनीकर्णिका नद्यांना मोठा पूर आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, नांदेडच्या भोकर तालुक्यात पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला. तर विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.

नगर, सोलापूर, सांगली जिल्ह्यांना पावसाने झोडपले

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱयानुसार नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले असून, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आजही अतिवृष्टी झाल्याने नांदणी आणि चांदणी नद्यांना पुन्हा पूर आला आहे. तर भूतवडा तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने जामखेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सांगलीत मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागांत पाणी साचले होते. सोलापुरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला असून, मोहोळ आणि अक्कलकोट तालुक्यांमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.