बीड जिल्ह्यातून अयोध्येला जाणार हजारो शिवसैनिक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अयोध्या दौरा अनुषंगाने बुधवारी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी ‘हर हिंदू कि यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार’ यावर चर्चा होऊन अयोध्या येथे बीड जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक जाणार आहेत. तर जिल्ह्यातील शहर, तालुका व प्रत्येक वाडी-वस्ती-तांड्यावर श्रीराम, हनुमान, महादेव मंदिरामध्ये महिलांसह पुरुषांनी आरती करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी दिली आहे.

बीड जिल्ह्यातील शिवसेना आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, युवासैनिकांची बैठक बुधवारी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, जालना रोड येथे घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाभरातील शहरांसह वाडी-वस्ती-तांड्यावर २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आरती करण्यात यावी असा आदेश जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी आपोपल्या जबाबदाऱ्या या बैठकीत वाटून दिल्या आहेत.

यावेळी सर्व पक्षपदाधीकारी व लोकप्रतिनिधींनी या आरतीचे शहर व गाव येथे असलेल्या  श्रीराम, हनुमान, महादेव, भवानी मंदिरांमध्ये नियोजन करून महिलांसह पुरुषांना सहभागी करून घ्यावे असे जिल्हाप्रमुखांनी शिवसैनिकांना आदेशित केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, जिल्हा सचिव जयसिंगमामा चुंगडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, भारत जगताप, आदी उपस्थित होते.