
उदय जोशी । बीड
बीडमध्ये खटोड प्रतिष्ठानच्या वतीने 31 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत आयोजीत कीर्तन महोत्सवात 501 कन्यांचा सामुहिक नामकरण सोहळा पार पडला. गतवर्षी 301 तर यंदा 501 मुलींचा नामकरण सोहळा एकाच मांडवाखाली संपन्न झाला.
कीर्तन महोत्सवाचा भव्य सभामंडप… एकाचवेळी तब्बल 501 पाळण्यात बसवलेल्या चिमुकल्या… व्यासपीठावरून गायिली जाणारी बारशाची गीते…अन् गर्दीने फुलून गेलेल्या सभामंडपात नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई…हे चित्र बीडकरांनी दुसऱ्यांदा अनुभवले ते येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणच्या 15 व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आयोजीत कन्यारत्नांच्या सामुहिक नामकरण सोहळ्यात..! यंदा दुसऱ्या वर्षीही ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमातंर्गत जिल्हा रूग्णालय प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकारातून रविवार सकाळी 10 वा.मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा पार पडला.
मुलीच्या आत्यांनी मुलींना कानात सूचवल्याप्रमाणे नामकरण झाले. आपल्या मुलीचा इतका सुंदर आणि अनोखा नामकरण सोहळा पार पडत असताना मुलींच्या आईच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. या नामकरण सोहळ्यास मुलींचे कुटुंबीय आणि नातेवाईकही आवर्जुन उपस्थित राहिले होते. मुलींच्या नामकरण सोहळ्यात मुलींना पाळणा, कपडे, खेळणी, चांदीचे वाळे अशा वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या तर मुलीच्या मातेला साडीचोळीचा आहेर, तसेच फेटा बांधून हळदी-कुंकू करत स्वागत सत्कार करण्यात आले.
‘माणसाची नियत चांगले काम करण्याची असेल तर तो कोणी येण्याची वाट न बघता आपले कार्य प्रामाणिकतेने करत असतो. आज खऱ्या अर्थाने बीड जिल्हा स्त्रीभु्रण हत्येचा कलंक धुवून काढण्यात यशस्वी ठरला आहे. यापुढील काळात आजच्या पाळण्यातील मुली नक्कीच मोठ्या पदावर जातील, विविध क्षेत्रात यशस्वी कार्य करतील’, अशी प्रतिक्रिया खासदार प्रितमताई मुंडे यांनी दिली.

























































