
हायपरलूप तंत्रज्ञान श्रेणीतील आघाडीची कंपनी व्हर्जिन हायपरलूप आणि केंपागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (बीएलआर) यांनी विमानतळापासूनच्या प्रस्तावित हायपरलूप कॉरिडॉरच्या अभ्यासासाठी सामंजस्य करार केला आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच सामंजस्य करार आहे. ताशी 1080 किलोमीटर वेगाने धावणाऱया हायपरलूपमुळे प्रति तास हजारो लोकांची बीएलआर विमानतळापासून सिटी सेंटरपर्यंत वाहतूक अवघ्या 10 मिनिटांत होणार आहे.
बंगळुरूमधील वाहतूक कोंडीच्या समस्येकर मात करून या शहराच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्याच्या उपाययोजनांमध्ये हायपरलूप कशा प्रकारे योगदान देऊ शकते, याची चाचपणी करण्यासाठी बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाशी भागिदारी करणे, ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे, असे व्हर्जिन हायपरलूपचे अध्यक्ष आणि डीपी कर्ल्डचे समूह अध्यक्ष सुलतान बिन सुलायेम म्हणाले. हायपरलूपशी जोडलेल्या विमानतळामुळे मालवाहतुकीच्या सेवेत आमूलाग्र सुधारणा होईल, असेही त्यांनी सांगितले.






















































