बंगळुरूत वेट मुंबईत वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। बंगळुरू

शनिवारी आघाडीच्या 11 बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार व्हेंटिलेटरवर गेले आहे. अवघ्या 13 महिन्यांचे सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकार बचाव मोहिमेंतर्गत बंगळुरू ते नवी दिल्ली अशी फोनाफोनी सुरू झाली असून जोर-बैठकांनाही जोर आला आहे. जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना नवा प्रस्ताव दिला आहे. कुमारस्वामी राजीनामा देतील आणि मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे विराजमान होतील असा हा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येते.

10 बंडखोर आमदारांना चार्टर्ड विमानाने शनिवारी रात्रीच मुंबईत आणण्यात आले असून वांद्रे येथील सॉफीटेल या पंचतारांकित हॉटेलात त्यांची बडदास्त ठेवण्यात आली आहे. या सर्व घडामोडींवर भाजपकडून ‘वेट ऍण्ड वॉच’ एवढीच प्रतिक्रिया आली असली तरी बंगळुरूत ‘वेट’ आणि मुंबईत ‘वॉच’ अशीच सध्याची स्थिती आहे. दरम्यान, कुमारस्वामी रात्री बंगळुरात दाखल झाले आणि त्यांनी आमदारांची बैठकही घेतली.

काँग्रेसच्या नऊ आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी शनिवारी राजीनामा घेऊन विधानसभाध्यक्षांना गाठले. मात्र अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हे सर्व आमदार राजभवनात पोहोचले आणि राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

12 बंडखोर आमदारांपैकी 10 जणांना रातोरात मुंबईत हलविण्यात आले असून आता वांद्रे येथील सॉफीटेल हॉटेल कर्नाटकातील राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या काही नेत्यांची हॉटेलमधील ये-जा वाढली असून हॉटेलबाहेर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही निदर्शने केली. बंगळुरू आणि मुंबईतील सॉफीटेल हॉटेल या दोन्ही ठिकाणी बैठकांचा सिलसिला सुरू आहे. काँग्रेस नेते कॅबिनेट मंत्री डी. के. शिवकुमार यांनी देवेगौडा यांची बंगळुरूमधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.