6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा पुन्हा संपाचा इशारा

16

सामना प्रतिनिधी, मुंबई

बेस्टचा प्रवास स्वस्त झाल्यानंतर पधरवडय़ातच प्रवाशांमध्ये पन्नास टक्के वाढ झाल्याने बेस्ट गाडे रुळावर येण्याची चिन्हे असतानाच बेस्ट वर्कर्स युनियनने कर्मचाऱयांचा रखडलेला वेतनकरार आणि सेवाशर्थीवरून येत्या 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत बेस्टची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

बेस्टचा प्रवास स्वस्त झाल्यामुळे आनंदित झालेल्या मुंबईकरांना येत्या ऐन सणासुदीच्या ऑगस्ट महिन्यात बेस्टच्या संपाला सामोरे जावे लागू शकते. बेस्ट कर्मचाऱयांच्या 28 एप्रिल 2012 रोजी झालेल्या वेतन कराराची मुदत 31 मार्च 2016 रोजी संपलेली आहे. तेव्हापासून बेस्ट कर्मचारी वेतन करारच्या प्रतीक्षेत आहेत. कर्मचाऱयांनी मतदान करून संप करण्याची भूमिका घेतल्याने 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संप करण्यात आला होता. तो संप तब्बल 9 दिवस सुरू होता. त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने 2007पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2019पासून 10 वेतनवाढी तातडीने देण्यास सांगितले होते.

नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारात कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात तातडीने वाटाघाटी सुरू करण्यात येतील, असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार बेस्ट उपक्रमाला 8 जुलै रोजी चर्चा करण्यासाठी पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर चार वेळा आठवण करून देण्यात आली. तरीदेखील बेस्ट प्रशासनाकडून कोणतेही उत्तर युनियनला देण्यात आलेले नसल्याने संपाची नोटीस देण्यात आली असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या