कोश्यारींनी अखेर गाशा गुंडाळला! रमेश बैस नवे राज्यपाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान करणारे आणि अनेक निर्णयांमुळे वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अखेर महाराष्ट्रातून गाशा गुंडाळावा लागला आहे. कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला असून रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्णन माथुर यांनी राजीनामा दिला होता. हे दोन्ही राजीनामे राष्ट्रपतींनी आज मंजूर केले. त्याचवेळी एकूण 13 ठिकाणी नव्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे.

कोश्यारींना पायउतार का व्हावे लागले?

राज्यपाल कोश्यारी हे वारंवार महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याने कोश्यारींविरुद्ध राज्यभरात संतापाची लाट उसळली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबईत विराट मोर्चा काढला. कोश्यारींच्या हकालपट्टीसाठी राज्यभरात शिवप्रेमी जनतेने निदर्शने केली तसेच कोश्यारींची प्रतिमा जाळून निषेध केला. या जनक्षोभामुळे कोश्यारी यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱयावर आले असता त्यांच्याकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रपतींकडे सोपवण्यात आला होता.

महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार असल्याचे भान नव्या राज्यपालांनी ठेवावे -संजय राऊत

राज्यपाल कोश्यारींनी भाजपचे राजभवनातील एजंट म्हणून काम पाहिले. ते काम घटनाबाह्य होतं. महाविकास आघाडीचे सरकार असताना कोंडी करण्याचा प्रयत्न कोश्यारींनी केला. मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारसी कोश्यारींनी नाकारल्या. पण, याबाबत राज्यपालांना दोष देत नसून, ते गृहमंत्रालयाच्या दबावात होते. व्यक्ती ही वाईट नसते. मात्र, दबावाखाली काम करावे लागते, तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला. नव्या राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राजभवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. विरोधी पक्षाचा घटना आणि लोकशाहीनुसार असलेला आवाज रमेश बैस यांनी ऐकायला हवा. मुख्य म्हणजे महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे, याचे भान राज्यपालांनी ठेवले पाहिजे, असे राऊत पुढे म्हणाले.

उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच

उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी दिली. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करता, तुमची लायकी काय रे? शिवाजी महाराज यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. त्यांचा अवमान खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कोल्हापुरात आनंदोत्सव

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यामुळे महाविकास आघाडीने आज बोलावलेल्या बैठकीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच, दीक्षान्त समारंभादिवशी गुरुवारी शिवाजी विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, 16 फेब्रुवारीला देण्यात आलेली ‘कोल्हापूर बंद’ची हाक देखील मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

सोरेन सरकार आणि बैस यांच्यातही संघर्ष

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकार आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यात संघर्ष सुरू होता. झारखंड विधानसभेने मंजूर केलेले ’झारखंड वित्त विधेयक-2022’ दोन दिवसांपूर्वीच रमेश बैस यांनी राज्य सरकारकडे परत पाठवले. त्याआधीही दोनवेळा हे विधेयक परत पाठवले गेले होते. गेल्यावर्षी बैस यांना न सांगताच त्यांचा प्रधान सचिव बदलण्यात आला होता. त्यावरून वाद झाला होता. झारखंडच्या 22व्या स्थापना दिनाला बैस उपस्थित राहिले नाहीत. झारखंडच्या इतिहासात असं प्रथमच घडलं. त्यामुळेच आता बैस यांची महाराष्ट्रातील कारकीर्द कशी असणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोण आहेत बैस?

रमेश बैस हे 2021 पासून झारखंडचे राज्यपाल होते. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. रायपूर मतदारसंघातून ते सात वेळा लोकसभेवर निवडून गेले. 1998 मध्ये वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. 1998 ते 2004 या दरम्यान पोलाद आणि खाण, रासायनिक खते अशी अनेक खाती त्यांनी सांभाळली.

पुणे, कोल्हापुरात फटाके फुटले

राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर शिवप्रेमी जनतेने फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून तर बारामतीत युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कोल्हापुरातही साखरपेढे वाटण्यात आले.

वादग्रस्त वक्तव्ये

  • छत्रपती शिवाजी महाराज जुनेपुराणे असून तरुणांनी आता नवीन आदर्श शोधायला हवेत.
  • चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थ रामदासांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?
  • जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचं लग्न झाले तेव्हा ते 13 आणि 10 वर्षांचे होते. त्या वयात मुलगा-मुलगी काय करतात?
  • मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढून टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत.

 आणखी एका न्यायाधीशाला राज्यपालपद

अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नझीर हे सर्वेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. अयोध्या वाद तसेच नोटबंदी, तीन तलाक या महत्त्वाच्या खटल्यांवर निर्णय देणाऱया खंडपीठात नझीर यांचा समावेश होता. गेल्याच महिन्यात ते निवृत्त झाले.

महाराष्ट्राची सुटका झाली

‘आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली झाली. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर एकप्रकारे महाराष्ट्राची सुटका झाली’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर दिली. राज्यपाल बदलण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. हा निर्णय फार पूर्वीच घेणे गरजेचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती, असेही पवार म्हणाले. कोश्यारी यांनी संविधानविरोधी निर्णय घेतले होते. त्याची चौकशी झाली पाहिजे का?, असा प्रश्न विचारला असता, कोश्यारी राज्यपाल असताना संविधानाच्या विरोधात जे जे काही झाले असेल त्या सर्वाची चौकशी व्हावी, अशी मागणी पवार यांनी केली.

हा महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्याचा विजय

महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱया, घटनाबाह्य सरकार बसवणाऱया, महाराष्ट्राच्या राज्यपालांना अखेर जावंच लागलं! हा महाराष्ट्राचा विजय आहे, इथल्या लोकभावनेचा विजय आहे, महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्याचा विजय आहे…गर्जा महाराष्ट्र माझा!, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

उशिरा सुचलेले शहाणपण

राज्यपाल कोश्यांची राजीनामा मंजूर झाला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे संभाजीराजे म्हणाले. महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची घडी मोडली होती. खरे तर दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा राजीनामा मंजूर व्हायला हवा होता, असे संभाजीराजेंनी पुढे नमूद केले.

राजीनामा उशिरा का स्वीकारला?

भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची गरीमा नष्ट केली, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच इतके दिवस राज्यपालांचा राजीनामा का स्वीकारला नाही, याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

13 नवे राज्यपाल

  • महाराष्ट्रः रमेश बैस
  • अरुणाचल प्रदेशः लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक
  • सिक्कीमः लक्ष्मण प्रसाद आचार्य
  • झारखंडः सी. पी. राधाकृष्णन
  • हिमाचल प्रदेशः शिवप्रताप शुक्ला
  • आसामः गुलाबचंद कटारिया
  • आंध्र प्रदेशः एस. अब्दुल नझीर
  • छत्तीसगडः विश्वभूषण हरिचंदन
  • मणिपूरः अनुसुईया उईके
  • नागालँडः एल. गणेशन
  • मेघालयः फागू चौहान
  • बिहारः राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
  • लडाखः ब्रिगेडियर (निवृत्त) बी. डी. मिश्रा ( नायब राज्यपाल)