भागोजी कीर स्मशानभूमीच्या कार्यशाळेवरील कारवाई थांबवा! मनमानी कारवाई केल्याचा शिवसेनेचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर पश्चिम येथील चैत्यभूमीजवळील भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीच्या कार्यशाळेवर पालिकेकडून मनमानीपणे सुरू असलेली कारवाई तातडीने थांबवावी अशी जोरदार मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. या स्मशानभूमीच्या ठिकाणी मुंबईच्या कानाकोपऱयातून मृतांचे नातेवाईक विधी-कार्य करण्यासाठी येत असतात. असे असताना नागरिकांच्या सुविधेसाठी बांधलेल्या कार्यशाळेवर कारवाई का करता, असा सवालही स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे.

चैत्यभूमीजवळ कै. भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीजवळ 135 वर्षांपूर्वीची ही कार्यशाळा आहे. या ठिकाणी दररोज विधी-कार्यासाठी येणाऱया अनेक नागरिकांसाठी ही कार्यशाळा उपयोगी ठरते. मात्र ही कार्यशाळा मोडकळीस आली होती. त्यामुळे ही कार्यशाळा दुरुस्त करण्याची मागणी केली जात होती. शिवाय जागा कमी असल्यामुळे जागा वाढवण्याची मागणीही केली जात होती. यानुसार पालिकेच्या जी-उत्तर विभाग आणि आरोग्य विभागाच्या परवानगीने सदा सरवणकर यांच्या दोन कोटींच्या आमदार निधीतून व  ‘म्हाडा’च्या माध्यमातून कार्यशाळा उभारण्याचे काम कोरोना काळातही दीड वर्षांनी पूर्ण करण्यात आले. मात्र या कार्यशाळेवर पालिकेच्या विभाग कार्यालयाकडून अचानक कारवाई सुरू करण्यात आली. गटप्रमुख पृष्णा पाटील यांच्याकडून कारवाईची माहिती मिळताच आमदार सदा सरवणकर यांनी ही कारवाई थांबवली.

समाजात तेढ निर्माण करू नका!

कार्यशाळेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आल्यास स्थानिक आमदार म्हणून सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी आपल्याशी चर्चा करणे अनिवार्य होते असे सदा सरवणकर म्हणाले. मात्र तसे न करता थेट कारवाई केल्याचे सरवणकर यांनी सांगितले. या कारवाईमुळे गैरसमज पसरून दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाई थांबवून संबंधित काम तातडीने पूर्ववत करावे अशी मागणीही सरवणकर यांनी केली आहे. चैत्यभूमी सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या स्थळाचे पावित्र्य राखूनच काम केले जाईल. कार्यशाळेबाबत कोणत्याही प्रकारच्या पुणाच्या तक्रारी असल्यास चर्चा करून तोडगा काढला जाईल, आवश्यक तो बदल केला जाईल असेही सरवणकर म्हणाले. परंतु मनमानी कारवाई करून दोन समाजात तेढ निर्माण करू नये असे आवाहनही त्यांनी केले.