भंडारदरा 80, दारणा 75, तर भावलीत 87 टक्के जलसाठा

नगर जिह्यातील मुख्य धरण असलेल्या भंडारदरा धरणामध्ये आज 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दारणा, भावलीच्या पाणलोटातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस चालू असल्याने दारणाचा पाणीसाठा 75.81 टक्क्यांवर पोहोचला होता, तर भावली 87.17 टक्के भरले होते.

भंडारदऱयाच्या पाणलोटात पावसाची रिपरिप सुरू आहे. घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. घाटघरला पाच इंच, तर रतनवाडीत साडेपाच इंच पाऊस पडला. त्यामुळे काल सायंकाळपर्यंत 537 दलघफू पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू असून, काल सकाळी 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात पाणीसाठा 3095 दलघफूवर(37.16) गेला होता. दोन-तीन दिवसांत या धरणातील पाणीसाठा 40 टक्क्यांवर पोहचणार आहे.

कमी-अधिक विश्रांतीनंतर दारणाच्या पाणलोटात पावसाचे जोरदार आगमन होत होते. सात टीएमसीच्या दारणात साडेपाच टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुकणे धरणात काल 54.21 टक्के पाणीसाठा झाला होता. भावली गेल्यावर्षी कालच्या तारखेला तुडुंब भरले होते. काल या धरणात 87.17 टक्के पाणी आहे. वाकी धरण 18.50 टक्के, भाम 47.36 टक्के, कश्यपी 25.97 टक्के पाणीसाठा आहे. तर गंगापूर धरणामध्ये 47.46 टक्के पाणीसाठा झाला आहे.

कुकडीत आवक वाढली

नगरजवळील शिरूर तसेच जिह्यातील पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यांची जीवनदायिनी असलेल्या कुकडी धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या समूहात 898 दलघफू पाणी नव्याने जमा झाले. वडज धरणही निम्मे भरले आहे. पाऊस सुरू असल्याने या समूहातील धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा 7837 (26.41 टक्के) दलघफू झाला आहे. या काळात या धरणात गतवर्षी उपयुक्त पाणीसाठा 19050 दलघफू होता. गत 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा- भंडारदरा 65 मिमी., घाटघर 126, पांजरे 90, रतनवाडी 136, वाकी 39 मिमी.