
सामना प्रतिनिधी । नगर
जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. नगरमधून या मागणीला विरोध होत असतानाच गुरुवारी सकाळी भंडारदरा धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी 4, 500 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. याला नेवासामध्ये तीव्र विरोध करण्यात आला असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्त्वाखाली मुळा धरण परिसरात जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडणार
दरम्यान, भंडारदरा धरणातून सोडलेलं पाणी आधी निळवंडे धरणात येईल. त्यानंतर जायकवाडीला पाणी सोडण्यात येईल पहिल्या तीन दिवसांत निळवंडे धरण पूर्ण भरून घेणार असून ओझर बंधाऱ्याच्या पूर्वेकडील प्रवरा नदी पात्रातील के. टी. वेअरच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्तात पाणी जायकवाडीकडे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
भावली धरणाच्या पाण्यावरून वाद पेटणार
नाशिकच्या भावली धरणातील पाणी ठाणे जिल्ह्यातील शहापुरलाही देण्यात येणार असून या धरणातील पाणी शहापूरसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे भावली धरणावरूनही वाद पेटण्याची चिन्हे आहेत.





























































