भंडारदरा, मुळा धरणात पाण्याची आवक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारदरा, मुळा पाणलोटात रविवारी दुपारपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने दोन्हीही धरणांत नव्याने पाण्याची आवक होत आहे. भंडारदरा धरणात 36 तासांत तब्बल 489 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. तर, मुळा नदीही दुथडी भरून वाहत आहे. छोटय़ा धरणांमधील पाणीसाठाही वाढत आहे.

पाणलोटात पावसाने दडी मारल्याने शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तसेच पावसाचा जोर नसल्याने दोन्ही धरणांच्या पाणीसाठय़ात फारशी वाढ झाली नव्हती, पण शनिवारी रात्रीपासून भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. घाटघरला 73 मिमी पाऊस पडला. त्यानंतर रविवारीही पावसाळी वातावरण टिकून होते. दुपारनंतर भंडारदरासह, घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पावसाने जोर धरला. घाटघरमध्ये धो-धो पाऊस होता. त्यामुळे नेकलेस, नामी, मनोहर, पांजरेसह अन्य लहान-मोठे धबधबे आता आक्राळविक्राळ रूप घेत असून, ओढेनाले भरभरून वाहत असून, धरणाच्या पाणीसाठय़ात सामावत आहेत. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात रविवारी सकाळी 4648 दलघफू साठा होता. तो सोमवारी सायंकाळी 5008 दलघफू झाला होता.

पावसाचे प्रमाण टिकून राहिले, तर लवकरच हे धरण निम्मे भरण्याची शक्यता आहे. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेतही नवीन पाणी येत असून, काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 1426 दलघफू होता. 102 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावातील पाणीसाठा 52 टक्क्यांवर पोहोचला आहे.