
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाबसह पाच राज्यांत नवीन वर्षात होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक फेरबदल करत नवीन प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. राज्यसभा खासदार विनोद तावडे, मेधा कुलकर्णी यांच्यासह राज्यातील चार नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचवेळी बिजू जनता दलातून भाजपमध्ये आलेल्या बैजयंत पांडा यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नितीन नवीन यांनी पक्षसंघटनेत राष्ट्रीय पातळीवर अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्ष-दीड वर्षात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबरोबर 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. यामध्ये विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी, तर मेधा कुलकर्णी यांच्याकडे सहप्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. भारती पवार यांच्याकडे गोवा, विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे दिल्ली व भागवत कराड यांच्याकडे मिझोरामचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजप नेत्या, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगढ, आणि हरयाणा, राम माधव-तामीळनाडू, उत्तराखंड, डॉ. सतीश पुनिया-पंजाब, जम्मू-कश्मीर, हरीश द्विवेदी-बिहार, कर्नाटक, तरुण चुघ यांची गुजरातच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वादग्रस्त मालवीय महाराष्ट्रात
सोशल मीडियामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना ट्रोलिंग करण्याची पुप्रथा रुजविणाऱया वादग्रस्त अमित मालवीय यांची महाराष्ट्र सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्यातील भाजप नेते सदानंद तानवडे, दिल्लीतील खासदार कमलजित सहरावत यांच्याकडेही सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.




























































