नीलेश राणेच गाड्या फोडा म्हणून सांगत होते, शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे चोख प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझ्या कार्यकर्त्यांची कसली धरपकड करताय, फुटेज तपासा, क्लीप पहा, तेच समोरुन चाल करून आले. माझा एकही माणूस बॅरीगेटच्या बाहेर गेला नाही. फुटेजमध्येच दिसतंय नीलेश राणेच गाड्या फोडा म्हणून सांगतायत. गाड्यांमधे बॉक्समधून भरून आणलेले दगड व्हिडीओमधून दिसतायत. ते फुटेज तपासा, अशी मागणी करताना शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांची धरपकड करताय, पण मी माझ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मी त्यांच्यासोबत उभा आहे. मला उद्या अटक झाली तरी चालेल असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले की, नीलेश राणे हे मुंबईतून येणार होते. मग त्यांना गुहागरला जायला दोन रस्ते होते. एक दापोली खेडमधून आणि दुसरा पेढे परशुराम येथून. पण तसं न करता ते साठ किलोमीटर चिपळूणात आले. मुददामहून त्यांनी हा सर्व प्रकार केला. त्यांच्या गाड्या माझ्या कार्यालयासमोरुन गेल्या. पण आम्ही कोणालाही रोखण्याचा प्रयत्न केला नाही. पोलीसांना आम्ही या सर्व प्रकाराबाबत पुर्वकल्पना दिली होती. माझ्या कार्यालयासमोर पोस्टर्स लावले होते. जो टीझर केला होता त्यातूनच दंगल घडवण्याचा इशारा होता. माझ्या कार्यालयावर दगडफेक करणार, राडा करणार. हे मी होऊ देणार नव्हतो. हेच मी पोलीसांना सांगितलं होते. सुरुवातीला पोलीसांनी त्यांना रोखून धरले. मात्र नंतर त्यांच्यावर कुठूनतरी दबाव आला. त्यांनी आमच्याच कार्यकर्त्यांना रोखलं आणि त्यांना मोकळं सोडलं. समोरुन चाल करण्यात आली. पोलीसांनी चारशे लोकांवरती काय, हजार लोकांवर गुन्हे दाखल करावेत. पण त्यापुर्वी फुटेज तपासावे असे आव्हान त्यांनी केले.

… हे देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? गृहखात्याला मान्य आहे का?
कालच्या भाषणात नीलेश राणे यांनी मी भास्कर जाधवला संपवणार असे वक्तव्य केले आहे. भास्कर जाधव जिथे जाऊन सभा घेतील तिथे जाऊन मी सभा घेईन. पण तिथे जाऊन तो सभा घेईल का? असे वक्तव्य केले आहे. म्हणजेच भास्कर जाधवचा खून करणार हे नीलेश राणेंनी मान्य केले आहे. मी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत हेच सांगितलंय की मला खूनाच्या धमक्या येतात. आता हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? गृहखात्याला मान्य आहे का? असा सवालही भास्कर जाधव यांनी केला. नीलेश राणेंचे वक्तव्य हीच भाजपची संस्कृती आहे का? कारण भाजपबददल आमच्या मनात जे काही विचार होते ते काल सर्व पुसले गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली.