सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ किनाऱ्य़ाला ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र

555

भोगवे समुद्र किनार्‍याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे हिंदुस्थानातील समुद्र किनार्‍यांचा अभ्यास केला. एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33 घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किनार्‍यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनार्‍याचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढर्‍या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनार्‍यावरील माड पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनार्‍यावरील निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते. याच समुद्र किनार्‍याची ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ने एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33 घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या