औषधी भोकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उगवत्या दिनकराच्या सोबतीने पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्याची इच्छा असेल तर तुम्हाला गोंदण वृक्षाकडे जावे लागेल. पूर्वी सर्वत्र आढळून येणारा, पण सध्या दुर्मिळ होत असलेला गोंदण वृक्ष अर्थात भोकर मानव आणि पक्ष्यांसाठी उपयोगी आहे. नैसर्गिकपणे जंगलात वाढणारा हा वृक्ष असून याचं शास्त्रीय नाव कार्डिया डायकोटेमा. स्थानिक भाषेत बारगुंड, गुंदन लासोरा, लसोडा, लसोरा, पिस्तन, रायगुंडो, गुंदा आणि संस्कृतमध्ये श्लेष्मान्तक, भुकरबुंदर इंग्रजीमधून इंडियन चेरी, क्लामी चेरी, सोप बेरी, सॅबॅस्टन प्लम अशी नावे आहेत.

भोकर ही वनस्पती हिंदुस्थान, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान या देशांत आढळते. हिंदुस्थानात ही वनस्पती कोरडय़ा पानझडी तसेच ओलसर मोसमी जंगलात सर्वत्र आढळून येते. महाराष्ट्रातही पश्चिम घाट, सातपुडा, कोकण सर्व ठिकाणी भोकरीचे वृक्ष नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले दिसून येतात. हा 10 ते 12 मीटर उंचीपर्यंत वाढणारा सदापर्णी वृक्ष आहे. त्याची साल धुरकट गडद रंगाची असून ती खडबडीत व फाटलेली असते. याची पाने साधी, एकाआड एक असतात, तर फुले लहान, पांढरी किंवा पांढरट हिरवी असतात. याची फळे गोलाकार, चकचकीत बोरांएवढी, पिकल्यावर पिवळसर किंवा गुलाबी पिवळसर रंगाची असतात.

भोकर या झाडाच्या प्रत्येक भागाचा वेगवेगळा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. भोकरीची फळे स्नेहन व संग्राहक आहेत. कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. फळ मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ, जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ यांसाठीही भोकरीचे फळ उपयोगी आहे. खोकला, छातीचे रोग, गर्भाशय व मूत्रमार्गाचे रोग तसेच प्लीहेच्या रोगात भोकरीची फळे वापरतात. भोकरीची साल संग्राहक व पौष्टिक आहे. भोकरीची साल फुप्फुसांच्या सर्व रोगांत उपयुक्त आहे. सालीचा रस खोबरेल तेलाबरोबर आतडय़ाच्या व पोटाच्या दुखण्यावर उपयुक्त आहे. साल सौम्य शक्तिवर्धक म्हणून उपयोगी आहे. सालीचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचारोगांवर वापरतात. सालीचा काढा जीर्णज्वरात आणि पुष्टी येण्यास देतात. कफ ढिला होण्यास, लघवीची आग कमी होण्यास व अतिसारात या फळांचा काढा देतात. यामुळे आतडय़ास जोम येतो. भोकराच्या सालीची राख तेलात खलून व्रण लवकर भरून येण्यासाठी लावतात. पिकलेले भोकर फळ, अडुळसा पाने व बेहडा फळे सम प्रमाणात घेऊन काढा करून खोकल्यावर देतात. अतिसारावर भोकरीची साल पाण्यात उगाळून देतात. मोडशीवर भोकरीची साल हरभऱयाच्या आंबीत उगाळून दिली जाते. भोकरीची पाने व्रण व डोकेदुखीवर उपयुक्त आहेत.

भोकराच्या कोवळ्या पानापासून तसेच फळापासून भाजी करतात. फळांच्या भाजीचा उपयोग अतिसारात केला जातो. या भाजीमुळे आतडय़ाची ताकद वाढते व पुष्टी येते. भोकराच्या फळांचे लोणचे खूप चविष्ट असून हे राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रात अगदी प्रसिद्ध आहे. भोकराचे लोणचे अग्निवर्धक, भूक वाढविण्यास व पचनासाठी चांगले आहे. रक्तपित्तात भोकरीच्या पानांची भाजी उपयोगी आहे. भोकराच्या झाडाची पाने चवीने खातात. भोकराच्या झाडाचे लाकूडही मजबूत असते. पोपट, मैना, बुलबुल, साळुंखी यांसारखे अनेक पक्षी या झाडांवर फळे खाण्यासाठी येतात. पावसाळा जवळ आला की, भोकरीची फळे पिकू लागतात. त्याचा सुगंध परिसरात पसरतो.