सावधान! आज सर्वात मोठी भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईच्या किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः कचऱ्याच्या लाटा उसळत आहेत. समुद्राला सलग आठ दिवस मोठी भरती येत असून भरतीबरोबर किनाऱ्यावर फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे अक्षरशः वाहतूककोंडी होऊ लागली आहे. उद्या रविवारी या मोसमातील सर्वात मोठी भरती येणार आहे. यावेळी पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

मुंबईजवळच्या समुद्रात भरतीच्या लाटा उसळत आहेत. या लाटांबरोबर समुद्रातील कचराही मोठय़ा प्रमाणावर किनाऱ्यांवर फेकला जात आहे. त्यामुळे मुंबईतील सहाही चौपाटय़ांवर कचऱ्याचा सडा पडलेला आहे. मरीन ड्राइव्हजवळ तर भरतीच्या लाटा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्यामुळे हा सगळा कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. परिणामी वाहतुकीची एक लेन बंद ठेवावी लागत आहे.

मुंबईच्या किनाऱ्यावर कचऱ्याच्या लाटा
शनिवारी मरीन ड्राइव्हवर अजस्र लाटा उसळल्या आणि समुद्रावर तरंगणारा कचरा रस्त्यावर आला. पालिकेच्या ५५ कामगारांनी राबून तब्बल ११ मेट्रिक टन कचरा उचलला. ओहोटी येईपर्यंत साडेतीन तासांत संपूर्ण प्रोमेनेड आणि कट्टा पर्यटकांसाठी साफ केला. सी वॉर्डचे ३५ कामगार आणि ए वॉर्डचे २० कामगार या साफसफाईसाठी राबत होते.

जुहू किनाऱ्यावर शुक्रवारी तब्बल १२० टन कचरा उचलण्यात आला तर शनिवारी संध्याकाळपर्यंत ६० टन कचरा उचलण्यात आला. वर्सोव्यात शुक्रवारी २४ टन तर शनिवारी २२ टन कचरा उचलण्यात आला. दादर चौपाटीवर शुक्रवारी ३५ तर शनिवारी ४२ टन कचरा निघाला. भरतीच्या वेळेस अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागू शकतो व त्यामुळे मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
दिवस         वेळ           लाटांची उंची
१५ जुलै   दुपारी १.४९       ४.९७ मीटर
१६ जुलै   दुपारी १४.३७      ४.८९ मीटर
१७ जुलै   दुपारी ३.२५       ४.७० मीटर