बापरे! महिलेच्या दोन्ही किडन्या चोरीला; डॉक्टर फरार, पतीनेही सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने डॉक्टरांवर तिच्या दोन्ही किडन्या चोरल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या कठीण काळात महिलेचा पतीही तीला सोडून निघून गेला आहे. पीडित महिला सध्या मुझफ्फरपूरच्या एसके मेडिकल कॉलेजमध्ये दाखल आहे. या महिलेची आर्थिक परिस्थितीदेखील बिकट आहे. ही महिला 3 मुलांची आई असून सध्या डायलिसिसवर आहे व रुग्णालयात मृत्यूशी झुंज देते आहे.

महिलेचे नाव सुनिता देवी आहे व तिच्या पतीचे नाव अकलू राम आहे. गर्भाशयात इन्फेक्शन झाल्याने सुनिता यांना बरियारपूर चौकाजवळील एका खासगी नर्सिंग होममध्ये उपचारासासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याचदरम्यान रुग्णालयात डॉक्टरांनी या महिलेच्या दोन्ही किडनी काढून घेतल्या आणि फरार झाले. तर आता सुनिता यांच्यावर मुजफ्फरपूरमधील एसके मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. व तीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत आहे. दर दोन दिवसांनी त्यांचं डायलिसिस करावं लागतं.

पतीनेही सोडली साथ..

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी तिचा पती तिच्यासोबतच होता व तिची काळजी घेत होता. तसेच त्याची एक किडनीदेखील तिला द्यायला तो तयार झाला होता. मात्र पतीची किडनी तिच्याशी जुळत नव्हती. दरम्यान काही दिवसांनी सुनिता आणि अकलू राम यांच्यामध्ये काही कारणामूळे भांडण झाले आणि तो तिला सोडून गेला. पण निघताना पतीने तिला अशी गोष्ट सांगितली की, तुझ्यासोबत माझा आयुष्य आता चालू शकणार नाही. यामुळे मी निघून जातो आहे, असे पतीने तिला सांगितले.

बनावट डॉक्टरांनी केली फसवणूक

मुजफ्फरपूरमधील शुभकांत क्लिनिकमध्ये 3 सप्टेंबर रोजी सुनिता देवी हिला दाखल करण्यात आलं होतं. सुनिताच्या गर्भाशयात झालेल्या इन्फेक्शनवर शस्त्रक्रिया केली जाणार होती. पण त्या रुग्णालयात शस्त्रक्रियेऐवजी बनावट डॉक्टरांनी तिच्या दोन्ही किडनी काढून घेतल्या. सुनिताची तब्येत दिवसेंदिवस अधिकच बिघडली तेव्हा त्याच रुग्णालयातील संचालक आणि डॉक्टर पवनने त्यांना पाटणातील नर्सिंग होममध्ये भरती केलं. तसेच सध्या पवन पोलिसांच्या ताब्यात आहे