
बिहारच्या जनतेने 30 वर्षीय तेजस्वी यादव यांना आपला नेता म्हणून पसंती दिल्याचे विविध वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’ वरून स्पष्ट झाले आहे. राजद-काँग्रेसचे महागठबंधन आणि जदयू-भाजपची एनडीए यांच्यात कांटे की टक्कर असल्याचा ‘एक्झिट पोल’चा अंदाज आहे. मंगळवारी (दि. 10) निकाल लागणार असून, बिहारमध्ये त्रिशंपु विधानसभा अस्तित्वाला येण्याची दाट शक्यता आहे.
बिहार विधानसभेच्या शेवटच्या तिसऱया टप्प्यातील मतदान आज झाले आणि सर्व 243 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. सायंकाळी 6 नंतर विविध वृत्तवाहिन्यांनी ‘एक्झिट पोल’चे अंदाज वर्तविण्यास सुरूवात केल्यानंतर नितिशकुमार यांच्या जदयू आणि भाजपच्या ‘एनडीए’मध्ये टेन्शन वाढले आहे. एनडीएसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री नितिशकुमार, डझनभर केंद्रिय मंत्र्यांच्या सभा, मेळावे, बैठका झाल्या. तर दुसऱया बाजूला महागठबंधनसाठी राजद अध्यक्ष तेजस्वी यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभा झाल्या. वडील लालुप्रसाद यादव तुरुंगात असताना तेजस्वी यांनी एकहाती किल्ला लढविला. त्यांच्या प्रचंड जाहीर सभा झाल्या. निवडणूक प्रचार सभांचा प्रतिसाद आणि ‘एक्झिट पोल’चा अंदाज पाहता तेजस्वी यादव यांना बिहारी जनतेने आपला नेता म्हणून निवडल्याचे स्पष्ट झाले आहे.
चिराग यांचा प्रभाव नाही
दिवंगत केंद्रिय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’पासून फारकत घेतली आणि स्वतंत्रपणे आपल्या ‘लोजपा’चे उमेदवार उभे केले. नितिशकुमार पुन्हा मुख्यमंत्री नको, भाजपचा मुख्यमंत्री हवा. नितिशकुमार यांना विरोध पण भाजपला नाही, अशी भूमिका चिराग यांनी घेतली; मात्र, जनतेने त्यांना नाकारल्याचे ‘एक्झिट पोल’वरून स्पष्ट होत आहे.
असा आहे ‘एक्झिट पोल’चा अंदाज
– शहरी भागात एनडीए तर महागठबंधनचा प्रभाव ग्रामीण भागात.
– कोरोनाची परिस्थिती व्यवस्थित न हाताळणे , स्थलांतरीत मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न, पूर परिस्थितीकडे दुर्लक्ष याचा फटका नितिशकुमारांना बसल्याचा अंदाज.
– बिहारमध्ये दारूबंदी नितिशकुमारांनी केली मात्र, महिला मतदारांची पसंती महागठबंधनला.
– पंतप्रधान मोदींच्या सभांचा फार मोठा परिणाम एनडीएवर नाही. मात्र, जदयूपेक्षा भाजपच्या जागा वाढणार.
– 10 लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्याची तेजस्वी यादव यांची घोषणा प्रभावी ठरली.






























































