
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात शाळेत जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांना भरधाव गाडीची धडक बसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात तीन मुलांचा मृत्यू झाला असून चौथ्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे.
गोंडा येथील करनैलगंजच्या सुबेदार पुरवाचे रहिवासी असलेले हे चार विद्यार्थी मंगळवारी सकाळी प्राथमिक शाळेत शिकायला जात होते. लखनौ महामार्गावरून जात असताना एका भरधाव गाडीने या चारही विद्यार्थ्यांना धडक दिली. या धडकेमुळे विद्यार्थी हवेत उडाले आणि खाली कोसळले.
यात हे चारही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यातील तीन जणांना मृत घोषित केलं. राम सागर, शिवांजली आणि तन्वी या तिघांचा मृत्यू झाला तर शिवांगी ही विद्यार्थिनी गंभीर जखमी आहे. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातानंतर कारचालक तिथून फरार झाला असून त्याच्या गाडीच्या फोटोच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर मृतांच्या घरी शोककळा पसरली आहे.

























































