शिक्षक की शैतान? पाच वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण, भयंकर व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील पाटणा शहरात एका शिक्षकाचा विद्यार्थ्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो शिक्षक पाच वर्षाच्या विद्यार्थ्याला काठीने बदडताना दिसत आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पाटणा शहरातील धानारुआ भागातील जया क्लासेस मध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. सदर नराधम शिक्षक त्या विद्यार्थ्याला काठीने मारताना व्हिडीओत दिसत आहे. विद्यार्थ्याला मारून मारून काठी तुटल्यावर त्याने हाता बुक्क्याने त्याला मारायला सुरुवात केली. शिक्षक मारत असताना तो विद्यार्थी दयेची भिक मागताना दिसत आहे. त्याला होत असलेली मारहाण पाहून इतर विद्यार्थीही भांबालेले त्या व्हिडीओत दिसत आहे.

हा शिक्षक इतक्यावरच नाही थांबला तर त्याने याबाबत घरी सांगितलंस तर जीवे मारून टाकण्याची धमकी देखील दिली.  त्यामुळे भेदरलेल्या अवस्थेत मुलगा घरी पोहोचला मात्र पालकांनी विचारूनही त्याने घरी काहीच सांगितले नाही. मात्र तो घऱात एका कोपऱ्यात कन्हत पडलेला होता. त्यावेळी त्याच्या पालकांना काहीतरी चुकीचं घडल्याचा संशय आला. त्यांनी तत्काळ मुलाला रुग्णालयात दाखल केलं. त्याच दरम्यान मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला. तो व्हिडीओ पाहून त्याच्या पालकांना धक्काच बसला. त्यानंतर संतप्त जमावाने त्या क्लासची तोडफोड करत शिक्षकाला चांगलाच चोपला. त्या विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी शिक्षक व क्लासच्या मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.