
सामना ऑनलाईन । लखनौ
सीमेपलीकडे सुरू असलेल्या दहशतवादी तळांचा नायनाट करण्याचा ‘ऍक्शन प्लॅन’ तयार आहे. वातावरण बिघडले तर हिंदुस्थान पुन्हा आक्रमक होईल. दहशतवादी हल्ले सुरूच राहिल्यास पाकिस्तानला सोडणार नाही. भविष्यातही ‘स्ट्राईक’ करू, असा सज्जड दमच लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला भरला आहे.
लखनौ येथे आसियान आणि आसियान प्लस देशांच्या वैद्यकीय प्रतिनिधींची ‘मेडेक्स 2019’ ही परिषद सुरू आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लष्करप्रमुख रावत बोलत होते. हिंदुस्थानच्या भूमीवर दहशतवादी हल्ला सहन केला जाणार नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना रोखले नाही तर हिंदुस्थानकडून कारवाई केली जाईल. दहशतवादी हल्ले सुरूच राहिल्यास आम्ही पुन्हा स्ट्राईक करू. निवडणुकांचा कोणताही परिणाम लष्कराच्या कारवाईवर होणार नाही, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.
सीमेवर अशांतता आहे, दोन्ही बाजूने गोळीबार होत आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे लष्कर सज्ज आहे. कोणतेही ऑपरेशन राबविण्यापूर्वी लष्कर त्याचा सर्वंकष विचार करते. त्यावर राजकीय निर्णय होतो. त्यानंतरच प्रत्यक्ष कारवाई केली जाते. यापुढील कारवाईही राजकीय निर्णयावरच केली जाईल, असे बिपिन रावत म्हणाले. लष्करप्रमुखांनी न्यूझीलंडमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांनी समाजावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असे ते म्हणाले.




























































