
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट भाजप मिंधे गटासोबत सत्तेत सहभागी झाला असला तरी त्यांच्या सहभागावरून अद्यापही भाजप व मिंधे गटातील अनेक जण नाराज आहेत. अजित पवार यांच्या समर्थकांकडून अनेकदा ते मुख्यमंत्री होणार असे दावे केले जातात. तसे असले तरी भाजपच्या एका मंत्र्याने मात्र अजित दादांना त्यावरून टोलाच लगावला आहे. हा टोला अजित पवार गटाला चांगलाच झोंबणारा आहे. ” अजितदादा अजून 20-25 वर्षांनी मुख्यमंत्री होतील” असा टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी लगावला आहे.
अतुल सावे यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना ही टिप्पणी केली आहे. ”अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार याबाबत त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यांना मुख्यमंत्री कधी करतील हे काही लिहिलेलं नाही. भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात. भविष्य कधीही असू शकते, 10 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षांनी ते मुख्यमंत्री बनू शकतील” असा टोला अतुल सावे यांनी लगावला आहे.




























































