भाजप विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; ’भाकप’ची कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

भारतीय जनता पार्टी विरोधात महापालिकेकडे तक्रार दाखल झाली आहे. दोन वेगवेगळे आरटीओ रजिस्ट्रेशन क्रमांक असलेल्या एकाच वाहनातून भारतीय जनता पार्टी विनापरवाना प्रचार करीत असल्याचा दावा करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बहिरनाथ वाकळे यांनी आचारसंहिता कक्षाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

शनिवार (10) दुपारी महापालिका प्रभाग क्रमांक सहा मधील प्रेमदान चौकामध्ये वाहनांवर लावण्यात आलेली एलईडी स्क्रिन व भोंग्याद्वारे भाजपचा प्रचार सुरू होता. या प्रचार करणाऱ्या वाहनावर दोन वेगवेगळे आरटीओ रजिस्ट्रेशन नंबर टाकण्यात आले होते. हे नंबर पाहून वाहनचालकाकडे चौकशी करून प्रचार परवानगीची प्रत भैरवनाथ वाकळे, दीपक शिरसाठ, रामदास वागस्कर, दत्ता वडवणीकर, विकास गेरंगे, तुषार सोनवणे यांनी मागितली. वाहनचालकाने परवानगीची प्रत दाखवली असता त्यावर 7 आणि 8 नोव्हेंबर या दोन दिवसांची प्रचार परवानगी असल्याचे आढळले. शनिवारी या वाहनाला प्रचार करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे चौकशी करून संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणीही भाकपकडून तक्रारीत करण्यात आली आहे.