चौफेर टिकेनंतर अखेर भाजपला जाग आली, बलात्कारी कुलदीप सेंगरच्या पत्नीचे तिकीट रद्द

उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तसेच तिच्या वडिलांची हत्या केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला भाजप आमदार कुलदीप याच्या पत्नीला दिलेले तिकीट अखेर चौफेर टिकेनंतर भाजपने रद्द केले आहे.

कुलदीप सेंगर याच्यापत्नी संगिता सेंगर यांना भाजपने उत्तर प्रदेश जिल्हा पंचायत निवडणुकीचे तिकीट दिले होते. फतेहपूर चौरासी वॉर्डातून त्यांना हे तिकीट देण्यात आले होते. यानंतर भाजपवरचौफेर टिका होत होती. अखेर आज भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी संगिता सेंगर यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.

ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत भाजपच बाजी मारणार आहे. उन्नावमधील फतेहपूर चौरासी वॉर्ड क्र. 22 मधून संगिता सेंगर यांना तिकीट देण्यात आले होते, मात्र आता ते रद्द करण्यात आले आहे. त्या आता भाजपच्या अधिकृत उमेदवार नसतील. लवकरच येथे नवीन नावाची घोषणा केली जाईल, असेही स्वतंत्र देव सिंह म्हणाले.

दरम्यान, संगिता सेंगर या उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुलदीप सेंगर यांच्या पत्नी आहेत. सध्या त्या जिल्हा पंचायद सदस्य आहेत. यंदाही त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र बलात्कारी नेत्याच्या कुटुंबातील सदस्याला तिकीट देण्यावरून येथे राजकारण सुरू झाले होते. निवडणुकीमध्ये भाजपला याचा तोटाही सोसावा लागला असता त्यामुळे त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले.

दरम्यान, उन्नाव येथे 4 जून 2017 रोजी पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. यानंतर तिच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला. 13 एप्रिल 2018 ला भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक करण्यात आली आणि सीबीआयकडून चौकशी झाली. त्यानंतर कारच्या अपघातात संशयास्पदरीत्या तिच्या दोन नातेवाइकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी आणि भाजपातून हकालपट्टी झालेला आमदार कुलदीपसिंग सेंगरला दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयाने 20 डिसेंबर 2019 रोजी बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण आणि पोक्सोअंतर्गत विविध कलमान्वये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

आपली प्रतिक्रिया द्या