
बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचे भाजपने दिल्लीत सेलिब्रेशन केले. बिहारमध्ये सत्य आणि विश्वास जिंकला आहे. तरुण, गरीब, शेतकरी जिंकला आहे. अपेक्षांचा विजय झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.
- लोकशाहीबद्दल हिंदुस्थानातील जनतेचा जो विश्वास आहे तो जगात कुठेही पाहायला मिळत नाही. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे.
- जो देशाच्या विकासासाठी काम करेल त्यालाच सेवा करण्याची संधी मिळेल हे देशवासियांनी सांगितले आहे. विकास हा मुख्य मुद्दा आहे. बिहारमध्ये सबका साथ सबका विकासचा विजय झाला आहे.
- बिहारमधील जनता जागरूक आहे. आम्ही नितीशकुमार यांच्या नेतृत्वात विकासाचा संकल्प सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगताना नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट संकेत दिले.
- भाजपला सायलेंट व्होटर मतदान करतात, असे सांगितले जाते. देशातील महिला मतदार हाच भाजपचा सायलेंट व्होटर आहे.






















































